BULDHANAChikhali

मेहकर तालुक्यातील जयताळाच्या दोघा युवकांवर आदिलाबादेत काळाचा घाला

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – आई-वडिलांना घरी न सांगता फिरायला गेलेल्या दोन मित्रांच्या कारला झालेल्या भीषण अपघातात हे दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील आदिलाबादजवळ ही दुर्देवी घटना घडली आहे. ठार झालेले दोघेही तरुण मेहकर तालुक्यातील जयताळा गावातील होते. त्यापैकी एकजण तर आई-वडिलांना एकुलता एक होता. आज पहाटे हा अपघात झाला.

राहुल सांगोळे (वय २०) आणि महादेव केशव जैताळकर (वय २१) अशी या दुर्देवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. राहुल हा त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक होता. त्याचे वडिल मेहकर पोलिस ठाण्यात होमगार्ड आहेत. मुलाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पाहून त्यांनी त्याला लातूर येथे शिक्षणासाठी पाठवले होते. परंतु, महादेव जैताळकरकडे असलेल्या कारने अचानक आदिलाबादकडे फिरायला गेले होते. या अपघातापूर्वी महादेवने आपल्या कारने राहुल व इतर मित्रांसोबत फिरायला जायचा प्लॅन आखला होता. मात्र इतर मित्र सोबत न आल्याने महादेवने राहुल यालाच नांदेडला बोलावून घेतले. महादेव हा मेहकरवरून नांदेडला गेला, तिथून दोघे एकत्र फिरायला निघाले होते. मात्र आज पहाटेच्या सुमारास त्यांची कार रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर धडकली. अपघात एवढा भीषण होता की, दोघांच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातामुळे मेहकर तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!