साखरखेर्डा (अशोक इंगळे) : अल निनोच्या फटक्याने पावसाने पाठ फिरवली, पाणीसाठे आटत चालले आणि गावोगावी तीव्र पाणीटंचाईची घंटा वाजू लागली असतानाही साखरखेर्डा परिसरात पाझर आणि सिंचन तलावांतून बिनदिक्कत पाणी उपसा सुरू होता. जनावरांच्या घशाला कोरड पडण्याची वेळ आलेली असताना काहींनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तलाव अक्षरशः पिळून काढले. या बेफिकिरीची बातमी प्रसिद्ध होताच अखेर प्रशासन खडबडून जागे झाले आणि महसूल विभागाने शनिवारी थेट कारवाईचा बडगा उगारत १० मोटारपंप (बेंड) जप्त केले.
तलावातील उरलेले पाणी जनावरे आणि वन्यजीवांसाठी राखीव ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली होती. त्यानंतर महसूल, महावितरण, ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने गायखेडी, महालक्ष्मी या सिंचन तलावांसह परिसरातील पाझर तलावांची पाहणी केली. गायखेडी तलावावर सकाळी ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणावर पाणी खेचणारे १० मोटारपंप जप्त केले आणि त्यांच्या वीजजोडण्या तोडल्या.
तहसीलदार अजित दिवटे यांच्या आदेशानुसार झालेल्या या कारवाईत मंडळ अधिकारी साळवे, ग्राम महसूल अधिकारी लखन राजपूत (शिंदी), अमोल गिरी (साखरखेर्डा-१), प्रशांत पोंधे (साखरखेर्डा-२), सहायक पोलिस उपनिरीक्षक संदीप मेदणे, पोहेकॉ. बाजीराव खरात तसेच महावितरणचे गीते, अरुण जैवळ, सुजल आदींनी सहभाग घेतला. ही कारवाई सहा तटस्थ पंचांच्या उपस्थितीत पार पडली.
गायखेडी तलावातील उपसा बंद करून उर्वरित पाणीसाठा दुष्काळात जनावरांना पिण्यासाठी राखीव करण्यात आला आहे. इतर काही तलावांतून अजूनही उपसा सुरू असल्यास तेथेही तातडीने कारवाई केली जाईल, असे मंडळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यापुढे अवैध उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
पाणीटंचाईचे संकट स्पष्ट दिसत असतानाही हा उपसा इतके दिवस कसा सुरू राहिला, याकडे प्रशासनाचे लक्ष का गेले नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरच कारवाई होणार असेल, तर एरवी देखरेख कुठे होती, अशीही चर्चा परिसरात आहे. एका तलावावरील कारवाईने हा प्रश्न मिटणार नाही; सर्वच जलस्रोतांवर सातत्याने नजर ठेवणे आणि दोषींवर कायमस्वरूपी जरब बसवणे हीच खरी कसोटी असेल.