-भव्य-दिव्य प्रकल्पाची पाहणी करून भारावले शेणफडराव घुबे; शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ठरणार मैलाचा दगड
चिखली (राजेंद्र घुबे) : देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी येथील माळरानावर उभारण्यात आलेल्या श्री बालाजी सूतगिरणी प्रकल्पाला नुकतीच भेट दिली. अनेक दिवसांपासून हा प्रकल्प प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची इच्छा होती. परवाच्या फेसबुकवरील एका बातमीमुळे हा योग जुळून आला. माझे परमस्नेही आणि मार्गदर्शक असलेले, तसेच नुकतीच जिल्हा सहकारी बँकेत तज्ज्ञ संचालक म्हणून निवड झालेले माझे गुरुवर्य मा. अंकुशराव पाटील हे या सूतगिरणीचे अध्यक्ष असल्याचे त्याच बातमीतून समजले. त्यामुळे ही सूतगिरणी प्रत्यक्ष पाहण्याची माझी मनिषा आणखीच बळावली. इच्छाशक्ती असेल, तर योग नक्कीच जुळून येतो, याचा प्रत्यय आज आला. हा भव्य प्रकल्प पाहून खरोखरच मन भरून आले.
तेथे आपल्याला सूतगिरणीचा एवढा मोठा प्रकल्प दाखवून देण्यासाठी कोणी असेल, याची कल्पनाही नसताना आम्ही सूतगिरणीच्या कार्यालयाच्या पोर्चमध्ये पोहोचलो. कार्यालयात डोकावून पाहताच एक सुखद धक्का बसला. डोळे दिपवून टाकणारा एवढा मोठा प्रकल्प उभारण्यामागील प्रेरणास्रोत, चिखली मतदारसंघाच्या धडाडीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांचे पती मा. श्री. विद्याधरजी महाले साहेब कार्यालयात बसलेले होते. मला पाहताच साहेब खुर्चीवरून उठून बाहेर आले. हस्तांदोलन करून, “आज अचानक कसे काय आलात?” अशी विचारपूस केली. आदराने माझा हात हातात घेत, “चला, आपण सूतगिरणी पाहून घेऊ,” असे म्हणत ते स्वतः आमच्यासोबत निघाले. त्यांच्यासोबत सूतगिरणीचा एकेक भाग पाहत आणि समजून घेत आम्ही पुढे जाऊ लागलो.
जिनिंग-प्रेसिंगपासून कापसाच्या रुईच्या गठाणी तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया, त्यानंतर रुईपासून जाड धागा आणि पुढे कापडासाठी आवश्यक असलेला अतिशय सूक्ष्म धागा तयार करण्याची प्रक्रिया आम्ही पाहिली. स्वयंचलित मशीनद्वारे धागा गुंडाळून निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या दर्जेदार धाग्याची निर्मिती आणि पॅकिंगची प्रक्रिया पाहून उत्सुकता शिगेला पोहोचली. मशीनचा बारीकसा, परंतु कानाला मंजूळ वाटणारा आवाज आम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेला. पाण्याच्या टाक्या, नव्याने उभारण्यात येत असलेली मोठमोठी गोदामे, सरकीपासून तेल तयार करणारा प्रस्तावित मोठा तेल कारखाना आणि साहेबांच्या कल्पनेतील भविष्यातील भव्य-दिव्य बहुआयामी प्रकल्प पाहून त्यांच्या कल्पकतेचा आवाका लक्षात आला आणि मन थक्क झाले. हा परिसर कसा निवडला आणि या प्रकल्पासंदर्भात भविष्यात आणखी काय योजना आहेत, असे मी साहेबांना विचारले. त्यावर आतापर्यंत केवळ वीस टक्केच प्रकल्प उभा राहिला असून, अजून बरेच काही बाकी असल्याचे सांगत साहेबांनी स्मितहास्य करत मोजक्याच शब्दांत उत्तर दिले.
संपूर्ण परिसराची पाहणी करताना मशीनरी आणि तांत्रिक बाबींची माहिती घेत आम्ही पुन्हा साहेबांच्या केबिनसमोर आलो. साहेबांची गाडी तेथे उभी होती. खरं म्हणजे, आम्ही सुरुवातीला तेथे पोहोचलो तेव्हा साहेब बाहेर जाण्याच्या तयारीत असल्याचे दरवाजावरील वॉचमनने सांगितले होते. मात्र, आम्हाला पाहताच साहेब स्वतः बाहेर आले आणि प्रकल्प दाखविण्यासाठी आदरपूर्वक आम्हाला आत घेऊन गेले. प्रकल्पाच्या प्रत्येक भागाची त्यांनी स्वतः माहिती दिली. माझ्यासारख्या लहान माणसासाठी हा फार मोठा सन्मान होता. एवढा मोठा माणूस स्वतः लहान होऊन आमच्यासारख्या सामान्य माणसांचा आदर करतो आणि एवढ्या मोठ्या कामाचे कोणतेही श्रेय स्वतःकडे घेत नाही, ही बाब मनाला भावली. “हे मजचिस्तव जाहले। परि म्यां नाही केले। ऐसे जेणे जाणितले। तो सुटला गा॥” या उक्तीप्रमाणे स्वतःच्या मोठेपणाचे दर्शन त्यांनी घडविले. यातच आदरणीय विद्याधरजी महाले साहेब यांचे खरे मोठेपण दडलेले असल्याचा अनुभव आला.
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मैलाचा दगड
खरं म्हणजे, विकासाची अत्यंत दूरदृष्टी ठेवून उभारण्यात आलेला आणि भविष्यात आणखी मोठा आकार घेऊन पूर्णत्वास जाणारा हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरू शकतो. बाहेरील देशांतून कापड आयात करून देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करण्याऐवजी शेतकऱ्यांचा कच्चा माल स्वतः खरेदी करून त्यावर प्रक्रिया करणे आणि त्यातून तयार होणारे कापड, खाद्यतेल व इतर उत्पादने देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्ध करून देणे, हा शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने टाकलेला धाडसी आणि महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. माझे ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुशरावजी पाटील हे या एवढ्या मोठ्या प्रकल्पाचे अध्यक्ष आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. सहकार क्षेत्रातील मोठा अनुभव आणि अत्यंत कडक शिस्त असलेले अंकुशरावजी पाटील हे “वरून फणसाचे काटे, परंतु आतून मात्र गराचे साठे,” असे निरागस व्यक्तिमत्त्व आहे, असा माझा अनुभव आहे. आदरणीय विद्याधरजी महाले साहेब यांची चाणाक्ष दृष्टी, अंकुशरावजी पाटील यांची अभ्यासू, चिकित्सक आणि शिस्तबद्ध वृत्ती तसेच त्यांच्या कन्या आणि चिखली मतदारसंघाच्या धडाडीच्या, विकासाभिमुख विद्यमान आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांची मिळणारी साथ, या सर्वांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाचा मानबिंदू ठरेल, यात शंका नाही. एवढेच नव्हे, तर तीस-तीस, चाळीस-चाळीस वर्षे सत्ता उपभोगणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा हा प्रकल्प ठरल्यास नवल वाटू नये.