अमडापूर–लवाळा रोडवर पीसीपीएनडीटी पथकाचा डिकॉय सापळा; बोगस डॉक्टरसह तिघे रंगेहाथ, पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त!
चिखली (अंकुश पाटील) : शेताच्या कडेला पत्र्याचा एक साधा गोठा. बाहेरून पाहणाऱ्याला तिथे काही संशयास्पद असल्याचा सुगावाही लागू नये, पण आत मात्र पोर्टेबल सोनोग्राफी मशीनवर गर्भातील बाळाचे लिंग तपासले जात होते. अकोला, वाशिम आणि बुलढाणा येथील पीसीपीएनडीटी विभागांच्या संयुक्त पथकाने शनिवारी हा प्रकार हाणून पाडला. अमडापूर–लवाळा रोडवरील शेतात झालेल्या या धडक कारवाईत बोगस डॉक्टर, वाशिम येथील एजंट आणि त्यांना मदत करणारा आणखी एक जण रंगेहाथ पकडला गेला. पथकाने सोनोग्राफी मशीन व तपासणीचे साहित्य जप्त केले असून तिघांविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा बोगस डॉक्टर वेगवेगळ्या ठिकाणी फिरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने अवैध गर्भलिंग निदान करत असल्याची खबर पीसीपीएनडीटी विभागाला मिळाली होती. उपसंचालक डॉ. आरती कुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने ही माहिती गांभीर्याने घेतली आणि डिकॉय (बनावट ग्राहक) केस तयार करून नियोजनबद्ध सापळा रचला. शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच पथक संशयित बोगस डॉक्टरच्या मागावर होते. पाठलाग करत असताना अखेर तो अमडापूर–लवाळा रोडवरील गणेश शंकरराव सूर्यवंशी यांच्या शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोहोचला. तिथे डिकॉय केसच्या माध्यमातून सोनोग्राफी तपासणी सुरू झाली आणि तपासणी सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या पथकाने झडप घातली. दुपारी २ वाजता बोगस डॉक्टर, वाशिम येथील एजंट आणि त्यांना मदत करणारा तिसरा इसम पथकाच्या ताब्यात आले.
घटनास्थळावरून सोनोग्राफी मशीन आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सायंकाळी ६ वाजता अमडापूर पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. चिखली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमर सय्यद यांनी ही फिर्याद दाखल केली.
तीन जिल्ह्यांच्या यंत्रणांच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वी झाली. अकोला मंडळाच्या उपसंचालक डॉ. आरती कुलवाल, बुलढाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि वाशिमचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. मोहिमेत डॉ. उमर सय्यद, डॉ. अनुप चौधरी, डॉ. सोनाली तायडे, ॲड. शुभांगी ठाकरे (विधी समुपदेशक), किरण जाणूनकर (स्टाफ नर्स, पीसीपीएनडीटी विभागीय पथक, अकोला), डॉ. राहुल डोंगरे, ॲड. राधा नरवलिया (विधी समुपदेशक, पीसीपीएनडीटी विभाग, वाशिम), ॲड. वंदना काकडे (विधी समुपदेशक, जिल्हा रुग्णालय, बुलढाणा), स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. उमेश सावजी (उपजिल्हा रुग्णालय, चिखली) आणि ज्ञानेश्वर मुळे (पीसीपीएनडीटी विभाग, बुलढाणा) यांनी विशेष मेहनत घेतली. वाशिम एलसीबीचे पोलीस कर्मचारी संतोष वाघ, तेजस्विनी खोडके आणि सुनील तायडे यांनी मोहिमेत विशेष सहकार्य केले, तर अमडापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांचीही मोलाची साथ मिळाली.
गर्भलिंग निदान करणे, गर्भाचे लिंग सांगणे किंवा अशा कृत्याला मदत करणे हा पीसीपीएनडीटी कायद्यानुसार दंडनीय अपराध आहे. स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालणे, मुलगा-मुलगी समानतेचा विचार समाजात रुजवणे आणि मुलींच्या जन्माचा सन्मान राखणे, या उद्देशाने प्रशासन अशा बेकायदा प्रकारांविरुद्ध कठोर भूमिका घेत आहे.