भोकर (हनुमान डाके) – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट येथे घेण्यात आलेल्या दोन दिवसीय शिबिरातून आदिवासी समाजातील ४१० मुलींची टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत नोकरीसाठी निवड करण्यात आली. टाटाच्या मोबाईल पार्टस् व इलेक्ट्रॉनिक्स विभागात या मुलींना रुजू करून घेतले जाणार आहे. या मुलींना नाेकरी मिळाल्याने त्यांचे पालक हरखून केले असून, प्रकल्प संचालक किर्तीकिरण पुजार यांचे प्रयत्न आणि त्याला टाटा कंपनीने तत्काळ दिलेला प्रतिसाद पाहाता, आदिवासी पालकांनी दाेघांचेही आभार व्यक्त केले आहेत.
कायद्यानुसार वय पूर्ण झाले की , मुलींचे लग्न लावून देण्याची आदिवासी पालकांची मानसिकता या मुलींच्या भविष्याला मर्यादा घालणारी होती. आजही फार कमी प्रमाणात आदिवासी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी त्यांचे पालक तयार होत नाहीत. यात काही परिवर्तन करता येईल का? , बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे , यादृष्टिने प्रकल्प संचालक तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी वेगळा विचार केला. त्यांनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीशी संपर्क साधून या मुलींना विकासाच्या प्रवाहात घेता येईल का याची चाचपणी केली. कंपनीच्या मानव संसाधन विभागाने याला तात्काळ प्रतिसाद देत किनवट येथे आपली टीम पाठवून दिनांक ६ व ७ सप्टेंबर या कालावधीत विशेष शिबिर घेतले. यात ६०० मुली सहभागी झाल्या. यवतमाळ , धारणी येथील केंद्रांतील मुलींनाही निमंत्रित केले होते. टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या पथकाने मुलींशी संवाद साधत यातील तब्बल ४१० मुलींची निवड केली. या सर्व मुलींना बेंगळूरू येथे विशेष प्रशिक्षण देऊन तेथून ५० किमी अंतरावर असलेल्या होसुर येथील टाटाच्या मोबाईल पार्टस् व इलेक्ट्रॉनिक्स विभागात रुजू केले जाणार आहे.
दरम्यान , लाईगुडापाडा येथील या मुलींपैकी एक असलेले पालक राजाराम मडावी यांनी आपल्या मुलीच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. हा आनंद व्यक्त करतांना राजाराम व त्याची पत्नी अत्यंत भावूक झाली. आमच्या पिढ्यांनी तालुक्याबाहेर जास्त दूरचे जग कधी बघितले नाही. मात्र पुजार यांच्या एका छोट्याशा प्रयत्नातून मुलगी बेंगळूरूला जाते, ती सुद्धा नौकरीसाठी असे सांगून आपल्या आनंद अश्रुंना वाट मोकळी करून दिली. याच भावना इतर पालकांच्या आहेत. याप्रसंगी सामाजिक कृतज्ञता आणि तत्परता यासाठी आदर्श मापदंड निर्माण करणाऱ्या टाटा कंपनीने यावर तात्काळ प्रतिसाद देत मुलींच्या निवडीसाठी सरळ किनवट गाठले, याबद्दल पालकांनी कंपनीचे आभार मानले आहेत.