चिखली (एकनाथ माळेकर) – गावात धुमाकूळ घालून ग्रामस्थांना जेरीस आणणार्या माकडांचा अखेर अंत्री खेडेकर ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा करून वन्यप्राणी मित्राच्या सहाय्याने बंदोबस्त केला. माकडांचा बदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली होती. परंतु, या विभागाचे अधिकारी झोपेचे सोंग घेऊन असल्याने अखेर ग्रामस्थांना आपली सुरक्षा आपणच करावी लागली. पकडलेली ही माकडे बोथा अभयारण्यात सोडण्यात आली आहे. माकडे पकडली गेल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे माकडांनी धुमाकूळ घालून ग्रामस्थांचे जीणे मुश्कील केले होते. याबाबतचे सविस्तर वृत्त ब्रेकिंग महाराष्ट्रने प्रसारित केले होते. तसेच, ग्रामस्थांनीही वनविभागाला याबाबत माहिती दिली होती. परंतु, वनविभागाचे अधिकारी झोपेचे सोंग घेऊन या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत राहिले. त्यामुळे वैतागलेल्या अंत्री खेडेकर ग्रामस्थांनी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा यांच्या पुढाकाराने व गावातील सुज्ञ नागरिकांच्या सहकार्याने सिल्लोड येथील वन्यप्राणी मित्र समाधान गिरी यांना माकडे पकडण्यासाठी गावात पाचारण केले. त्यांच्या सहकार्याने आज सकाळी गावातील माकडे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली. तसेच, गावात धुमाकूळ घालणारी माकडे पिंजर्यात जेरबंद करण्यात येवून ती बोथा येथील अभयारण्यात नेऊन सोडून देण्यात आली आहेत.
या माकडांनी गावात धुमाकूळ घालून लोकांना जगणे मुश्कील केले होते. विशेष करून लहान मुलांवर ही माकडे हल्ले करत होते. तसेच गावातील घरांवर उड्या मारून पत्रे मोडणे, मालाची नासधुस करणे, दुचाकी-चारचाकी गाड्यांवर उड्या मारणे व त्यांचे नुकसान करणे, असा या माकडांचा गावात उपद्रव सुरु होता. या त्रासाला कंटाळून गावातील सुज्ञ नागरिकांनी सुरुवातीला वनविभागाकडे तक्रार केली. परंतु, त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी वन्यप्राणी मित्राला बोलावून गावातील माकडे पकडले व ती वनात सोडून दिली आहे.