-साखरखेर्ड्यात भक्तिमय वातावरणात विसर्जन सोहळा; विविध मंडळांच्या मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथे नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. टिपरी आणि गरबा नृत्याने मिरवणुकीत वेगळीच रंगत आणली. सार्वजनिक मिरवणुकीत सहा, तर इतर ठिकाणी १२ देवींच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या.
आज सकाळपासून नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. काही देवींचे विसर्जन खंडोबाच्या माळावरील तलावात, तर काहींचे महालक्ष्मी तलाव आणि गायखेडी तलावात करण्यात आले. दुपारी एक वाजता संत संताजी जगनाडे महाराज चौकातून मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. येथे मोकळे पटांगण असल्याने प्रत्येक मंडळाने उत्साहात नृत्याचा आणि मिरवणुकीचा आनंद घेतला. त्यानंतर मिरवणूक मेन रोड, अग्रसेन चौक, गुजरी चौक, गणपती चौक, अहिल्याबाई होळकर नगर, रोहिलपुरा आणि महात्मा ज्योतिबा नगर मार्गे भोगावती नदीवर पोहोचली. मिरवणुकीत अग्रस्थानी परदेशी नवदुर्गा माता मंडळ, अनुसया माता नवदुर्गा उत्सव मंडळ, महात्मा फुले नवदुर्गा मंडळ, जगदंबा माता उत्सव मंडळ, अहिल्याबाई होळकर नवदुर्गा मंडळ आणि वीर लहुजी वस्ताद नवदुर्गा मंडळ सहभागी झाले होते.
प्रत्येक मंडळात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. टिपरी नृत्य आणि गरबा नृत्यामुळे मिरवणुकीची रंगत वाढली. अनुसया माता मंडळातील महिला व युवतींनी आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. वाद्यांच्या गजरात आणि पावली खेळत निघालेली मिरवणूक रात्री सात ते आठ वाजेपर्यंत भोगावती नदीवर सुरू होती. त्यानंतर मंडळांनी आपापल्या पद्धतीने देवींचे विसर्जन केले. महालक्ष्मी तलाव परिसरात एकता नवदुर्गा मंडळासह आठ मंडळांनी शांततेत मिरवणुका काढल्या. येथे सायंकाळी सहा वाजता विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीत माजी सरपंच महेंद्र पाटील, अमित जाधव, माजी सरपंच सुनील जगताप, संतोष मंडळकर, गोपाल पाझडे, संदीप मगर, दिलीप बेंडमाळी, संदीप खिल्लारे, संतोष दसरे, महसूल मंडळाधिकारी प्रशांत पोंधे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य सहभागी झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सचिन मदने यांच्यासह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.