-नागपूर पदवीधर मतदारसंघाची आज निवडणूक; ४१ मतदान केंद्रांवर व्यवस्था सज्ज, सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान
वर्धा (प्रकाश कथले) : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी वर्धा जिल्ह्यातील ४१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जिल्ह्यातील एकूण २१ हजार ७४२ पदवीधर मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ४१ मतदान केंद्रांमध्ये आष्टी येथे २, कारंजा येथे ३, आर्वी येथे ६, आंजी मोठी येथे १, सेलू येथे २, सिंदी रेल्वे येथे १, सेवाग्राम येथे १, वर्धा येथे ११, पुलगाव येथे २, देवळी येथे २, समुद्रपूर येथे २ आणि हिंगणघाट येथे ८ मतदान केंद्रांचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, झोनल अधिकारी आणि मायक्रो ऑब्झर्व्हर अशा २५० हून अधिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदान शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावे, यासाठी आवश्यक संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण २१ हजार ७४२ मतदारांमध्ये १३ हजार ९९ पुरुष आणि ८ हजार ६४३ महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानेही आवश्यक तयारी केली आहे. मतदान केंद्रांवर शांतता व सुव्यवस्था राखणे, मतदारांना निर्भय वातावरण उपलब्ध करून देणे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडणे, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क राहणार आहे.