-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; प्रज्ञा, शील, करुणा आणि मानवतेचा संदेश
सुलतानपूर (वाजिद खान) : भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर करत सुलतानपूर येथे बौद्ध समाजबांधवांच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिकेत आयोजित अभिवादन सभेत भीम अनुयायी, बौद्ध उपासक-उपासिका आणि विविध सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.
महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भीम अनुयायी एकत्र आले. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा व पुतळ्यांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर उपासक-उपासिकांच्या सहभागातून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. बुद्धांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ आंबेडकरवादी भागवतराव पनाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अभिवादन सभेत विविध मान्यवरांनी उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वि.वि.का.सो.चे अध्यक्ष वामनराव झोरे, संतकृपा उद्योग समूहाचे वसंतराव जुमडे, सागर पनाड, राजेश पिंपरकर आणि सुभाष खेत्रे यांनी आपल्या मनोगतातून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. बुद्धांनी दिलेला शांतता, समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
प्रज्ञा, शील, करुणा आणि मानवता अंगीकारण्याचे आवाहन
राष्ट्रीय सेवासंघाच्या सद्भावना मंचाचे शांतीलाल बोराळकर यांनी भगवान बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा, शील, करुणा आणि मानवता ही जीवनमूल्ये प्रत्येकाने आपल्या आचरणात आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. समाजात बंधुभाव, परस्पर आदर आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी बुद्धविचारांचा स्वीकार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते महेंद्र पनाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करणे म्हणजे समता व सामाजिक परिवर्तनाची मूल्ये समाजात रुजविणे होय, असे मत व्यक्त केले. महापुरुषांचे विचार केवळ जयंती-पुण्यतिथीपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
भीमगीतांनी जागविल्या सामाजिक परिवर्तनाच्या आठवणी
कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ उपासक सुरेश पनाड यांनी सादर केलेल्या भीमगीतांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. भीमगीतांच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनकार्याची आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीची आठवण जागविण्यात आली. उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अभिवादन सभेत सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला भागवतराव रिंढे, शे. गफ्फार साहेब, माजी सरपंच सलीमखा पठाण, गजानन भानापुरे, मनोहर भानापुरे, भाऊराव भालेराव, संजाब खरात, मधुकर भानापुरे, मनोहर बापुना भानापुरे, कैलास हरकाळ, डिगांबर सुरुशे, रामचंद्र जुमडे, माधव आंबेकर, प्रदीप सुरुशे, साईनाथ डुबे, आयुबखाँ, माजी उपसरपंच सुखदेवराव झोरे, गोपाल भानापुरे, सदस्य शे. अजहर, शंकर निकम, दीपक राजगुरू, ज्ञानेश्वर हरकाळ, वैभव टकले, बाळू पाटील, गणेश तागडे, राजेश पाटील आणि गणेश टकले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच तुळशीराम पनाड, बबन पनाड, पारस पनाड, विजय मोरे, अशोक जावळे, भगवानराव साळवे, महादा पनाड, रमेश पनाड, सुदाम पनाड, संजाब पनाड, बाळू पनाड, राजू जावळे, विठ्ठल अवसरमोल आणि साहेबराव शेजुळ यांच्यासह बौद्ध समाजातील शेकडो उपासक-उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राहुल अवसरमोल यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सुलतानपुरात बुद्धविचार, सामाजिक समता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.