– “हा तर बॉम्ब होता, लवकरच अणुबॉम्ब टाकणार”; मनोज जरांगे पाटलांचा इशारा, तर शिंदेंचे पुराव्यासह तपासाचे थेट आव्हान!
जालना (जिल्हा प्रतिनिधी) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी (२२ ऑक्टोबर) घेतलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत कथित ऑडिओ क्लिप उघड करत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत किंवा भाजपच्या एका ऑनलाइन बैठकीतील संवादाचा दावा करत ही क्लिप ऐकवण्यात आली. यामध्ये जरांगे यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत ५०० कोटी रुपये पोहोचल्याचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला असून, या ऑडिओ बॉम्बमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र झाल्या आहेत.
पत्रकार परिषदेत ऐकवण्यात आलेल्या या कथित ऑडिओ क्लिपमध्ये एका ऑनलाइन कॉन्फरन्स मीटिंगमधील संवाद असल्याचे समोर आले आहे. यामध्ये जरांगे पाटील यांना आधीच ५०० कोटी रुपये मिळाल्याचा दावा केला गेला असून, हे पैसे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पोहोचल्याचे एका महिलेच्या आवाजात ऐकू येते. तसेच, विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांची भूमिका भाजपसाठी फायदेशीर ठरेल की नाही, यावर चर्चा असून त्यांना बदनाम करण्यासाठी मराठवाड्यात विशिष्ट नरेटिव्ह सेट करणे गरजेचे असल्याचे या क्लिपमध्ये म्हटले आहे. या क्लिपमध्ये दोन ते तीन पुरुष आणि एक महिला असून, हे आवाज नेमके कुणाचे आहेत, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका घेत जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत आणि कडक इशारा दिला आहे. “माझ्या नादी लागू नका, नाहीतर १ ते २ महिन्यात असं काही बाहेर काढेन की सगळे हादरून जातील. मी आता थांबणार नाही, १०० वर्षांत जे बाहेर आलं नाही ते बाहेर काढणार,” असा थेट इशारा त्यांनी दिला. गेल्या तीन वर्षांपासून आपल्या आणि मराठा आरक्षणाविरोधात छुप्या पद्धतीने षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून, क्लिपमधील संवादातील व्यक्तींचा शोध सरकारने घ्यावा, अन्यथा यामागे त्यांचाच हात असल्याचा संशय असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच सर्व आरोप फेटाळून लावत, “कुणीही ५०० कोटी रुपये दिले नाहीत आणि घेतलेही नाहीत. जरांगे पाटील यांनी शहानिशा करून पुराव्यासह संबंधित यंत्रणांसमोर जावे, दूध का दूध पाणी का पाणी होईल,” असे आव्हान दिले होते. भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, जरांगे यांनी याबाबत रीतसर तक्रार दाखल करावी आणि प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी ही ऑडिओ क्लिप एआयच्या जमान्यात फॅब्रिकेटेड किंवा बनावट असण्याची शक्यता वर्तवली असून, गृहखात्यामार्फत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.