-गेल्या २५ वर्षांपासून ग्रामीण भागात विनामानधन कीर्तनसेवेच्या माध्यमातून समाजप्रबोधन; मान्यवरांकडून अभिनंदन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील ह.भ.प. पंजाबराव महाराज बिलारी यांची महाराष्ट्र प्रदेश निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या सिंदखेडराजा तालुका सचिवपदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र प्रदेश निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेचे पदाधिकारी कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करताना कोणतीही फी अथवा मानधन घेत नाहीत. निरपेक्ष भावनेने ते निःशुल्क समाजप्रबोधनाचे कार्य करतात. ह.भ.प. पंजाबराव महाराज बिलारी हेसुद्धा गेल्या २५ वर्षांपासून ग्रामीण भागात निरपेक्ष कीर्तनसेवा देत आहेत.
त्यांच्या निरपेक्ष कीर्तनसेवेची दखल घेऊन संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. नाना महाराज कापडणीस (नाशिक), संस्थापक सचिव ह.भ.प. साहेबराव महाराज गवळी (संभाजीनगर), महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. माऊली महाराज गरूड (पंढरपूर) आणि महिला प्रदेशाध्यक्षा ह.भ.प. गायत्रीताई महाराज कोंडे-देशमुख (पुणे) यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तिपत्र त्यांना देण्यात आले आहे. परमार्थिक कार्य, संकीर्तन आणि प्रबोधनात्मक कार्य करताना संस्थेच्या ध्येयधोरणांनुसार कोणतीही दक्षिणा किंवा पैसे न मागता निरपेक्ष भावनेने परमार्थिक कार्य करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्तिपत्रात नमूद करण्यात आले आहे. ह.भ.प. पंजाबराव महाराज बिलारी यांच्या या निवडीबद्दल ह.भ.प. डिगांबर गाडे महाराज, ह.भ.प. गणेशराव इंगळे महाराज, ह.भ.प. कैलास महाराज निर्मळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.