– ग्रामीण भागातील लेकीची देदीप्यमान कामगिरी; जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मिळवला पहिला क्रमांक!
चिखली (अंकुश पाटील): ग्रामीण भागातील प्रतिभेने पुन्हा एकदा कमाल दाखवली आहे. मेहकर येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील ४६ किलो वजन गटात श्री शिवशंकर विद्यालय, भरोसा मेरा चौकीची होतकरू विद्यार्थिनी कुमारी शिवानी बाबुराव हाटकर हिने प्रथम क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या शानदार विजयामुळे तिची आगामी अमरावती येथील विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेदरम्यान शिवानीने तिच्या उत्कृष्ट कुस्ती कौशल्याचे आणि चपळाईचे प्रदर्शन करत प्रत्येक डावात प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. तिच्या या उल्लेखनीय यशाने श्री शिवशंकर विद्यालय आणि संपूर्ण परिसराचा मान उंचावला आहे.
शून्य ते शिखरापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. नियमित सराव, कठोर परिश्रम आणि जिद्द यांच्या बळावर शिवानीने हे यश मिळवले आहे. या यशामागे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अरुण लेंडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, ज्यांनी शिवानीच्या प्रत्येक डावाला पैलू पाडण्याचे काम केले.
शिवानीच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती लीलाताई शिरसाठ मॅडम, विद्यालयाचे प्राचार्य श्री. संदीप वायाळ सर, सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांनी तिचा गौरव करून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्यात.
ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने जिल्हास्तरावर मिळवलेले हे यश थक्क करणारे आहे. परिसरातील नागरिक, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून शिवानीवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी अमरावती येथील विभागीय स्पर्धेतही ती अशीच धडाकेबाज कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.