-वनविभागाच्या पथकाकडून शेतात पाहणी; ग्रामस्थांना ‘घाबरू नका, पण काळजी घ्या’चा संदेश
चिखली (महेंद्र हिवाळे) : चिखली तालुक्यातील अंत्री कोळी येथे बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळताच वनविभाग, बुलढाणा तात्काळ सतर्क झाला. माहिती मिळताच वनरक्षक समाधान झोटे यांनी उपवनसंरक्षक जमीर शेख आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. वाकोडे यांना याबाबत कळविले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वनरक्षक समाधान झोटे यांनी तात्काळ पथकासह अंत्री कोळी गावात धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत वनपाल पी. पी. मुंडे, वनरक्षक एस. व्ही. शिंदे व जी. आर. शिंदे उपस्थित होते. वनविभागाच्या पथकाने हनुमान संस्थान येथे ग्रामस्थांना एकत्र करून बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर जनजागृती केली. यावेळी ‘घाबरू नका, पण काळजी घ्या’ असा संदेश देत बचावाबाबतची पत्रके ग्रामस्थांना वाटण्यात आली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने गट क्रमांक २१३ मधील शेतात पाहणी केली.
मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित
यावेळी विठ्ठल गिरी, सुरेश वाघ, सिद्धार्थ हिवाळे, नितीन वाघ, सांगा वाघ, शिवाजी इराळे, अमोल वाघ, विष्णू डुकरे, सोनाजी वाघ, गोटू वाघ, अंकुश वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी
वनविभागाने शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शेतात जाताना शक्यतो गटाने जावे. सोबत काठी व बॅटरी ठेवावी. जनावरे लवकर गोठ्यात बांधावीत तसेच बांधावरील झुडपे साफ करावीत. बिबट्याचा वावर आढळल्यास आरडाओरड किंवा दगडफेक करू नये. मुलांना एकटे सोडू नये. बिबट्याचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्याच्या प्रयत्नात जाऊ नये तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
वनविभाग बुलढाणा संपर्क : ७९७२६७५२२४