-दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीत आढावा बैठक; अचूक व त्रुटीविरहित पंचनाम्यांच्या सूचना
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : खरीप हंगामातील पिकांचे नुकसान आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासनाची मदत वेळेत मिळावी, यासाठी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. मात्र, घाईच्या नादात पंचनाम्यांमध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना तहसीलदार अजित दिवटे, गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर आणि तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी दिल्या.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर २९ सप्टेंबर रोजी पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहात दुष्काळ आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महसूल, ग्रामविकास, कृषी आणि भूमी अभिलेख विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेने परस्पर समन्वयाने काम करून पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. राज्य शासनाने खरीप हंगाम २०२६ मध्ये Trigger-1 लागू झालेल्या तालुक्यांमध्ये विविध दुष्काळी उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे हा पुढील मदत प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करावी. पिकांची स्थिती आणि नुकसानीचे प्रमाण अचूकपणे नोंदवावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
तातडीचे, मात्र अचूक पंचनामे
पंचनाम्यांच्या कामाला गती देतानाच त्यामध्ये चुका होणार नाहीत, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. चुकीची किंवा अपूर्ण माहिती नोंदविल्यास पुढील मदत प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष नुकसानीची पडताळणी करूनच पंचनामे करावेत. तसेच आवश्यक कागदपत्रे आणि माहितीची योग्य नोंद करावी, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गावनिहाय पिकांची परिस्थिती, नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी आणि पंचनाम्याच्या कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
दिवाळीपूर्वी मदत पोहोचविण्याचे नियोजन
मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल, या उद्देशाने पंचनामे आणि त्यानंतरची प्रशासकीय कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. यासाठी महसूल, ग्रामविकास, कृषी आणि भूमी अभिलेख विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश देण्यात आले. पंचनाम्यांची प्रक्रिया केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष शेतातील नुकसानीचे वास्तव त्यामध्ये प्रतिबिंबित झाले पाहिजे, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. यामुळे पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
बैठकीस तहसीलदार अजित दिवटे, गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक रचना जाधव, महसूल विभागाचे नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, तसेच विस्तार अधिकारी पवार, घुगे यांच्यासह ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी आणि कृषी सहायक उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाची मदत वेळेत मिळावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी जबाबदारीने, पारदर्शकपणे आणि समन्वयाने काम करावे, अशी भूमिका बैठकीत अधोरेखित करण्यात आली.