– पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात संतापजनक प्रकार; कायद्याची पायमल्ली करत वृद्ध महिला आणि फ्रॅक्चर झालेली चिमुकली एकाच पलंगावर; प्रशासनाचा अनागोंदी कारभार!
पिंपरी-चिंचवड (महेंद्र हिवाळे): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण (YCM) रुग्णालयात रुग्णांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी खेळणारा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील रुग्णालयात एकाच बेडवर चक्क दोन वेगवेगळ्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच बेडवर एका बाजूला हात फ्रॅक्चर झालेली एक लहान मुलगी आणि दुसऱ्या बाजूला एक वयोवृद्ध महिला रुग्ण उपचार घेत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
वृद्ध महिलेला नेमका कोणता आजार वा संसर्ग आहे, याची कोणतीही वैद्यकीय दक्षता न घेता दोघींना एकाच बेडवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्या लहान मुलीला गंभीर संसर्ग (क्रॉस इन्फेक्शन – Cross-Infection) होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. वैद्यकीय सेवेचा हा अनागोंदी कारभार पाहून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वायसीएम प्रशासनाचा हा कारभार केवळ निंदनीय नसून तो थेट वैद्यकीय नियमांचे आणि कायद्यांचे उल्लंघन करणारा आहे:
- क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट कायदा (Clinical Establishments Act): या केंद्रीय कायद्याच्या किमान मानकांनुसार (कलम १०.२६ आणि १०.२९), रुग्णालयाने संसर्ग रोखण्यासाठी रुग्णांच्या बेडमध्ये पुरेसे अंतर राखणे बंधनकारक आहे. तसेच बेड उपलब्ध नसल्यास रुग्णाला अन्य सुविधेत ‘रेफर’ करणे नियमात बसते, मात्र एकाच बेडवर दोन रुग्णांना ठेवणे बेकायदेशीर आहे.
- रुग्ण हक्क सनद (Patient Rights Charter): केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमांनुसार, प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र बेड, स्वच्छता आणि संसर्गापासून सुरक्षेचा मूलभूत अधिकार आहे.
- भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २७२: निष्काळजीपणाने संसर्ग पसरेल असे कृत्य करणे हा कायदेशीररीत्या शिक्षेस पात्र गुन्हा ठरतो.
शहरातील हजारो गरीब आणि सामान्य रुग्ण उपचारासाठी वायसीएम रुग्णालयावर अवलंबून असतात. मात्र, बेडची कमतरता हे कारण पुढे करत प्रशासनाकडून रुग्णांच्या जिवाशी खेळला जात आहे. या गंभीर प्रकरणाची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि रुग्णांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.