-जानकीदेवी विद्यालय व रामकृष्ण इंग्लिश स्कूलच्या संयुक्त विद्यमाने डीजेमुक्त मिरवणूक; सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे विविध देखावे सादर
चिखली (राजेंद्र घुबे) : देऊळगाव घुबे येथे जानकीदेवी विद्यालयाच्या वतीने श्रीगणेश विसर्जनाचा सोहळा भक्तिमय व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी जानकीदेवी विद्यालय व रामकृष्ण इंग्लिश स्कूलने एकत्रितपणे डीजेच्या ध्वनीप्रदूषणाचा गोंगाट टाळून पारंपरिक व सांस्कृतिक मूल्यांना प्राधान्य देणारी विसर्जन मिरवणूक काढली. विविध आकर्षक व विचारप्रवर्तक देखाव्यांच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा संदेश देण्यात आला.
डीजे व मोठ्या आवाजाचा गोंगाट न करता दिग्दर्शन-मृदंगाच्या नादासह विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी संदेशांमुळे मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या अनोख्या उपक्रमातून गावकऱ्यांना मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश मिळाला.
विद्यार्थ्यांकडून विविध सामाजिक व सांस्कृतिक देखावे
मिरवणुकीत विविध देखावे सादर करण्यात आले. प्रत्येक देखाव्यामागे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी तसेच ढोल-लेझीम नृत्य सादर केले. इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘आजचा शेतकरी’ आणि गुढीपाडवा उत्सवाचे देखावे सादर केले. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी माता रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासह कोरड्या दुष्काळाची परिस्थिती यावर आधारित देखावे सादर केले. वारकरी दिंडी व मृदंगाच्या गजरात करण्यात आलेल्या सादरीकरणातून वारकरी संप्रदायाची परंपरा आणि भक्तीभावाचे दर्शन घडले. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या देखाव्यातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. तसेच क्रांतिकारक, थोर महापुरुष, समाजसुधारक व स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या कार्यावर आधारित देखाव्यांमधून विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी विचार मांडले.
गावकऱ्यांकडून मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिस्तबद्ध आणि वैचारिक स्वरूपाच्या या मिरवणुकीला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन्ही विद्यालयांच्या वतीने सादर करण्यात आलेले देखावे तसेच विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषेने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा प्रकारच्या मिरवणुका आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. मिरवणूक विघ्नहर्ता गणेश मंडळासमोर आल्यानंतर मंडळाच्या वतीने भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. उद्धवराव घुबे, माजी प्राचार्य हरिदासजी घुबे, विद्यमान प्राचार्य बबनराव लांडगे तसेच विद्यालयाच्या शिक्षिका सविता राऊत यांचे स्वागत करण्यात आले. प्रा. उद्धवराव घुबे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना फराळ म्हणून बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
नियोजनासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य
या संपूर्ण आयोजन व नियोजनासाठी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. उद्धवराव घुबे यांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक वर्गाला आवश्यक सुविधा व साहित्य उपलब्ध करून दिले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार जानकीदेवी विद्यालयाचे माजी प्राचार्य हरिदास घुबे, विद्यमान प्राचार्य बबनराव लांडगे तसेच रामकृष्ण इंग्लिश स्कूलचे प्राचार्य अमोल घुबे यांनी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन केले. उत्कृष्ट नियोजन व उपक्रमशीलतेबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेनफडरावजी घुबे यांनी दोन्ही विद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. शांततामय वातावरणात कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करत भविष्यातही अशाच प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जानकीदेवी विद्यालय व रामकृष्ण इंग्लिश स्कूलच्या या विसर्जन मिरवणुकीत धार्मिक श्रद्धेसोबत सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण संवर्धनाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण होते.