-शेतीच्या नुकसानीसह वडिलांचे कर्ज वाढल्याने आर्थिक विवंचना; कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याची माहिती
साखरखेर्डा (वार्ताहर) : सिंदखेडराजा तालुक्यातील रताळी येथील युवा शेतकरी पुत्राने शेतात जाऊन एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. मृतक युवकाचे नाव आकाश बळीराम पाटील (वय २६) असे आहे.
रताळी येथील शेतकरी बळीराम पाटील यांना दोन मुले, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांच्याकडे चार एकर शेती असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. चार एकर शेतीतून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने कुटुंबाचे आर्थिक बजेट कोलमडले होते. शेतीच्या उत्पन्नातून कुटुंबाचा खर्च भागत नसल्याने बळीराम पाटील आणि त्यांची दोन्ही मुले मिळेल ती शेती करून कुटुंबाला हातभार लावत होते. पत्नी लक्ष्मीबाई यादेखील मोलमजुरी करून घरखर्चासाठी मदत करीत होत्या.
सन २०१९-२० मध्ये बळीराम पाटील यांनी भारतीय स्टेट बँकेकडून कृषी कर्ज घेतले होते. चार एकर शेतीच्या उत्पन्नातून या कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. त्यातच सतत वाढणारे व्याज आणि दरवर्षी घटत जाणारे शेती उत्पादन यामुळे बँकेचे कर्ज वाढत गेले. शासनाने कर्जमाफीच्या पहिल्या व दुसऱ्या याद्या जाहीर केल्या; मात्र यापैकी एकाही यादीत बळीराम पाटील यांचे नाव आले नसल्याचे सांगण्यात आले. यावर्षी आकाश याने विठ्ठल गायकवाड यांची १० एकर शेती करण्यासाठी घेतली होती. या शेतात नांगरणी व वखरणी करून सोयाबीन आणि तुरीची पेरणी करण्यात आली. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिके चांगली बहरली होती. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. सोयाबीनचे एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना प्रत्यक्षात एकरी ८० किलो सोयाबीनचे उत्पादन होणेही कठीण झाले. या १० एकर शेतीसाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च झाला; मात्र त्यातून सोंगणीचा खर्चही निघणे कठीण झाल्याचे सांगण्यात आले.
शेतीचे नुकसान, त्यातून निर्माण झालेली आर्थिक विवंचना आणि वडिलांचे वाढते कर्ज या पार्श्वभूमीवर आकाश सकाळी दूध काढण्यासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडला. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास राजू सरकटे हेही शेतातील म्हशीचे दूध काढण्यासाठी जात असताना त्यांच्या शेताच्या धुऱ्यावरील पळसाच्या झाडाला आकाश लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी तत्काळ ही माहिती गावात दिली. त्यानंतर गावातील नागरिक घटनास्थळी पोहोचले असता आकाशने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आकाशचा चुलत भाऊ सागर परशुराम पाटील यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मेहकर येथे पाठविला. पुढील तपास ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे करीत आहेत.