-तहसीलदार अजित दिवटे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वाहिली आदरांजली
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा तहसील कार्यालयात शुक्रवारी (२५ सप्टेंबर) अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
तहसीलदार अजित दिवटे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास निवासी नायब तहसीलदार बंगाळे, महसूल नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, संजय गांधी विभागातील गणेश नागरे, महसूल सहायक संजय सोनवणे यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी समाजातील सर्व घटकांच्या विकासाचा विचार मांडत ‘अंत्योदय’ या संकल्पनेला महत्त्व दिले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचविण्याचा त्यांचा विचार प्रशासनासाठीही प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करून जनसेवा, सामाजिक बांधिलकी आणि लोकाभिमुख प्रशासनाची मूल्ये जपण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याला अभिवादन केले.