-रामकृष्ण विवेकानंद व जानकीदेवी विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन; छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध विषयांवरील देखावे सादर होणार
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : दरवर्षीप्रमाणे जानकीदेवी विद्यालयाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त देऊळगाव घुबे नगरीत ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही ही परंपरा कायम ठेवत रामकृष्ण विवेकानंद विद्यालय व जानकीदेवी विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक देखावे सादर करण्यात येणार आहेत.
मिरवणुकीच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतन, पारंपरिक वेशभूषा, भव्य दहीहंडी प्रदर्शन, संतभूमीचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन, गुढीपाडवा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या कार्य व योगदानाचे महत्त्व विविध देखाव्यांच्या माध्यमातून सादर केले जाणार आहे. तसेच आदिवासी संस्कृती आणि निसर्ग संवर्धनाचे महत्त्वही विद्यार्थ्यांकडून अधोरेखित केले जाणार आहे. मिरवणुकीची सुरुवात जानकीदेवी विद्यालयातून होणार असून विद्यार्थी, शिक्षक व आमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत गणेशमूर्ती व पालखीचे प्रस्थान होईल. त्यानंतर मिरवणूक खंडोबा महाराज मंदिर परिसरात पोहोचणार असून तेथे श्री खंडोबा महाराजांचे दर्शन व पूजन करण्यात येणार आहे. यानंतर मिरवणूक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचेल. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे आकर्षक देखावे व सादरीकरण तसेच उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.
त्यानंतर मिरवणूक विघ्नहर्ता गणेश मंडळ येथे पोहोचणार असून विद्यालयाच्या वतीने भव्य महाआरती करण्यात येईल. विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर बस स्टॉप मार्गे मिरवणूक पुन्हा जानकीदेवी विद्यालयाकडे मार्गस्थ होईल. विद्यालयाच्या प्रांगणात मिरवणुकीचा समारोप होणार असून भव्य अंतिम महाआरती, श्री गणरायाची सामूहिक आरती व प्रार्थना करण्यात येणार आहे. यानंतर विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व आमंत्रित मान्यवरांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक मिरवणुकीत गावातील ज्येष्ठ नागरिक, वडीलधारी मंडळी, युवक व महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. मिरवणुकीसाठी सर्वांनी सकाळी ठीक ८ वाजता राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
मिरवणुकीचा मार्ग : जानकीदेवी विद्यालय → खंडोबा महाराज मंदिर परिसर → राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक → विघ्नहर्ता गणेश मंडळ → बस स्टॉप मार्गे → जानकीदेवी विद्यालय → अंतिम महाआरती → भव्य महाप्रसाद.