आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील आळंदी नगरपरिषदेच्यावतीने टपरी, पथारी, हातगाडी धारकांना पक्के गाळे मिळेपर्यंत अतिक्रमण कारवाई करू नये, केंद्र व राज्य सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशा प्रमाणे फेरीवाले, टपरी, पथारी हातगाडी धारक यांच्यासाठीचे धोरणावर कायद्या प्रमाणे आळंदीत प्रभावीपणे कामकाज करण्याची मागणी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना निवेदन देत, टपरी पथारी हातगाडी पंचायतचे अध्यक्ष कष्टकर्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केली.
या वेळी माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सरचिटणीस प्रकाश यशवंते, मुख्याधिकारी अंकुश जाधव, बांधकाम विभाग प्रमुख सचिन गायकवाड, शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गांडेकर, आळंदी समन्वयक अर्जन मेदनकर, सुलतान शेख, हमीद शेख, अॅड. प्रियेश सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष बाबा कांबळे यांचे नेतृत्वात आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचे समवेत शिष्टमंडळ प्रतिनिधी यांनी येथील समस्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली. यात हातगाडी, पथारी, टपरी व्यावसायिकांचे योग्य त्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर एकमत झाले. मुख्याधिकारी जाधव यांनी सर्व संबंधित घटक तसेच प्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांचे समवेत पुनर्वसन करण्यासाठी जागेचा सर्व्हे करण्याची ग्वाही दिली. उपस्थित मान्यवर पदाधिकारी यांनी कोणावर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीत विविध समस्या, फेरीवाला सर्व्हेक्षण, फेरीवाला धोरण अंमलबजावणी, अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले साहित्य परत देणे अशा मुद्द्यावर यावेळी चर्चा करून संवाद साधण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे, बांधकाम विभाग प्रमुख सचिन गायकवाड, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, कार्याध्यक्ष बळीराम काकडे आदी मान्यवरांनी चर्चेत भाग घेतला. टपरी, पथारी, हातगाडी व्यावसायिक, विक्रेते यांचे हितासाठी खेळीमेळीचे वातावरणात या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी आळंदी शहर कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांच्या नियुक्तीचे पत्र अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले.