Uncategorized

शुकदास म्हणे, हेचि माझे देव । अर्पिला मी जीव, त्यांच्यासाठी।।

प्राचीन काळापासून मनुष्याला ईश्वराच्या स्वरूपाचे कुतूहल असलेले दिसून येते. आपापल्या परीने प्रत्येक काळात अनेक तत्त्ववेत्त्यांनी ईश्वराविषयीचे विवेचन केलेले आढळून येते. मध्ययुगीन संत साहित्यात या संदर्भात बरेच विश्लेषण केलेले आहे. संतांनी पहिल्यांदाच सर्वसामान्यांचे अतिशय सोप्या पद्धतीने समाधान केलेले दिसते. सर्वसामान्य माणूस या काळात अज्ञानाने ग्रासून गेला होता. अनेक समस्या त्याच्यापुढे आ-वासून उभ्या होत्या. अशा भयभीत समाजाला मानसिक आणि भावनिक आधार देण्याचे काम संतांनी केले. ईश्वर प्राप्तीचे मार्ग संतांनी सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची ईश्वरप्राप्ती विषयीची व्याख्या सर्वपरिचित आहे.

तुकाराम महाराज म्हणतात,

जे कां रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ।।१।।
तोचि साधु ओळखावा ।देव तेथेची जाणावा ।।२।।
मृदु सबाह्य नवनीत।तैसे सज्जनांचे चित्त।।३।।
ज्यासि अपंगिता नाही ।त्यासी धरी जो हृदयी।।४।।
दया करने जे कुत्रासी ।तेचि दासा आणि दासी।।५।।
तुका म्हणे सांगू किती। तोचि भगवंताची मूर्ति ।।६।।

दुःखीत, पीडितांना जो आपलेसे करतो तोच खरा साधू ओळखावा आणि त्याच्याजवळ देव आहे असे जाणावे. लोणी जसे आतून-बाहेरून मऊ असते त्याप्रमाणे साधूचे चित्त देखील मऊ असते. ज्याला कोणीही आश्रय देत नाही. अशा अनाथांना जो आपल्या हृदयात स्थान देतो. जे प्रेम मुलावर तेच प्रेम दासावर आणि दासीवर जो करीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा साधू बद्दल किती सांगू? अरे तो साक्षात भगवानच आहे. अशा सोप्या पद्धतीने माणसातील देवाची ओळख संत तुकाराम महाराज करून देतात. वारकरी संप्रदायाचे अद्वैत तत्त्वज्ञान चराचरात ईश्वराचा अंश मानते. ईश्वर आणि भक्त हे वेगळे नसून एकच आहे.प्रत्येक माणसात ईश्वराचा अंश आहे.माणसाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. हा विचार संतांनी जनमानसात पेरून समाजात मोठी सामाजिक आणि आध्यात्मिक क्रांती घडवून आणली.
स्वामी विवेकानंदांच्या क्रांतीकारी विचारांतही ‘प्रत्येक जीव हा मूळ स्वरूपात ईश्वरी आहे’ याच विचाराचे दर्शन घडते. ‘शिवभावे जीवसेवा‘ हेच त्यांचे ध्येय दिसून येते. हाच विचार निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराजांनी आपल्या जीवितकार्यात पायाभूत मानलेला दिसून येतो. निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराज आपल्या अनुभूती ग्रंथातील ३१ क्रमांकाच्या अभंगात म्हणतात की,

ज्या मी देवाचा, आहे उपासक । करूनि ओळख, देतो त्याचा्r।।
या इकडे तुम्ही, पहा तो नयनी।नटला रूपांनी दुःखीतांच्या ।।
गरीब अनाथ, अपंग दलित। तोचि हा पतीत, झाला अज्ञ।।
शुकदास म्हणे, हेचि माझे देव। अर्पिला मी जीव, त्यांच्यासाठी।।

मी ज्या देवाची उपासना करीत आहे, जे खर्‍या अर्थाने माझे आशास्थान, श्रद्धास्थान आहेत, ज्यांची मी पूजा करतो, त्यांची ओळख तुम्हाला आता मी करून देतो. तुम्ही माझ्याकडे या आणि डोळ्यांनी प्रत्यक्ष पहा. या दुःखितांच्या रूपातच मला ईश्वराचे दर्शन घडते. ही ईश्वराची रूपं समाजात अनेक आहेत. समाजातील अनाथ, गरीब, दुःखीत, पीडित, दलित, अपंग अशा विविध रूपात मला ईश्वर दर्शन घडते. शुकदास महाराज म्हणतात, हेच माझे देव आहेत, यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. त्यांच्या सेवेसाठीच मी माझ्या संपूर्ण आयुष्याचे समर्पण केले आहे. मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी समाजातील लोकांमध्ये महाराजांना देवदर्शन घडले. त्यांची दुःख जाणून घेऊन त्यावर मायेची फुंकर मारण्याचा प्रयत्न केला. शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रमाच्या रूपाने शिक्षण आणि आरोग्याच्या माध्यमातून वरील विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविलेला. आधुनिक काळातील दीनदुबळ्यांचे दुःख दूर करण्यासाठी शिक्षणासारखा रामबाण उपाय दुसरा नाही हे त्यांनी हेरले.
आणखी एका ठिकाणी कर्मयोगी संत शुकदास महाराज आपल्या अनुभूती ग्रंथातील ११४ क्रमांकाच्या अभंगातून समाजातील इतर लोकांना दीनदुबळ्यांच्या उद्धारासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहेत, असे महाराजांना मनोमन वाटते. हा विचार व्यक्त करताना महाराज अनेक प्रश्न उपस्थित करतात. शुकदास महाराज म्हणतात,

गरीब लोकांची, पाहूनिया दैना । येते का करूणा, तुम्हा लागी।।
डोळ्यातील त्यांचे, अश्रू पुसण्यास। केला का सायास, कोणीतरी ।।
प्रेतकळा त्यांची, पाहूनि नयनी। आले का भरूनी, नेत्र कधी।।
शुकदास म्हणे, दीन दुबळ्यांना।जवळ कराना, आता तरी।।

गोरगरिबांची हलाखीची परिस्थिती पाहून तुम्हाला पाझर फुटत नाही का? त्यांची करूणा तुम्हाला का येत नाही? त्यांचे दुःखाअश्रू पुसण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी हे मानवा तू कोणते प्रयत्न केले? गोरगरिबांची अवस्था प्रेतासारखी निष्क्रिय, चेतनाहीन झाली आहे. हे पाहून तुझ्या डोळ्याला पाणी येत नाही काय? त्यांच्या शरीरातील चैतन्यच नाहीसे झालेले पाहून तुला दुःख होत नाही काय? शुकदास महाराज म्हणतात, या पूर्वीचे काहीही असो; परंतु आता तरी दीनदुबळ्यांना जवळ करा. असा सल्लाही संत शुकदास महाराज देण्यास विसरले नाही. संत शुकदास महाराज आपल्या प्रत्यक्ष कृतीबरोबरच गोरगरिबांच्या उद्धारासाठी समाजातील इतर लोकांनीही पुढे यावे हेच सुचीत करत्ाात. यातूनच कर्मयोगी संत शुकदास महाराजांची समाजाबद्दलची आंतरिक तळमळ दिसून येते. अभंगातील गरिबांची दैना, करुणा, प्रेतकळा, डोळे भरून येणे इत्यादी शब्द महाराजांच्या संवेदनशीलतेचा परिचय करून देतात.

(लेखक हे संत साहित्याचे अभ्यासक, व्याख्याते व विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आहेत. मो.नं ९९२३१६४३९३.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!