BULDHANA

शिक्षकी पेशाला काळिमा फासला! पाचवीच्या विद्यार्थिनीवर नराधम मुख्याध्यापकाचाच लैंगिक अत्याचार!

– तुझा अभ्यास चेक करायचा म्हणून चिमुकलीला कॅबिनमध्ये घेतले, अत्याचार केला!

नांदुरा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील मुरंबा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकानेच पाचवीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, विशेष म्हणजे ५ सप्टेंबर या शिक्षकदिनीच हे घृणास्पद व किळसवाणे कृत्य नराधम मुख्याध्यापकाने केले आहे. देविदास दिघोळे असे या नराधमाचे नाव असून, शिक्षकी पेशाला काळिमा फासणार्‍या या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे.

पाचवीच्या वर्गात शिकणार्‍या चिमुकलीला नराधम देविदास दिघोळे याने तुझा अभ्यास चेक करायचा आहे म्हणून आपल्या कॅबिनमध्ये बोलावले व तेथे अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचार केला. मुरुंबा हे छोटेसे गाव असून, या गावात पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेवर दोन शिक्षक कार्यरत आहेत. एक शिक्षक अकोला येथून ये-जा करतात व दुसरे मुख्याध्यापक देविदास दिघोळे हे शेगाव येथून ये-जा करतात. शिक्षकदिनी दुसरे शिक्षक शाळेवर आले नसल्याचे पाहून आरोपी मुख्याध्यापक देविदास दिघोळे याने पाचवीत शिकणार्‍या एका मुलीला आपल्या केबिनमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार केला. कुणालाही सांगू नको अशी धमकीही दिली. मात्र, मुलीने आपल्या आईला घटना सांगितल्यावर पालकांनी व गावातील नागरिकांनी पिंपळगावराजा पोलीस स्टेशन गाठून या नराधम मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ भारतीय दंडविधानाच्या ३५४ कलम व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच हा नराधम मुख्याध्यापक फरार झाला होता. परंतु, आज त्याला मोठ्या शिताफीने पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!