-प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीची मागणी; “मागण्या मान्य होईपर्यंत सत्याग्रह आंदोलन सुरूच राहणार” — डॉ. ज्ञानेश्वर टाले
मेहकर (सुरेश हुसे) : शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती, मेहकर येथे सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
शेतपांदण रस्ते, फळबाग व सिंचन विहिरींच्या प्रलंबित कामांचा मुद्दा
शेतपांदण रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, फळबाग, गुरांचे गोठे आणि सिंचन विहिरींना मंजुरी देऊन प्रलंबित देयके अदा करावीत, पंचायत समिती स्तरावरील सेस फंडाचा नियमानुसार खर्च करावा, तसेच दिव्यांगांच्या पाच टक्के निधीचा अनुशेषासह विनियोग करावा, अशा मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. तसेच मागील पाच वर्षांतील दिव्यांग निधीच्या खर्चाची माहिती उपलब्ध करून द्यावी आणि ग्रामपंचायतनिहाय दिव्यांग लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मनरेगा कामांची चौकशी करण्याची मागणी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) झालेल्या विविध कामांची चौकशी करावी, मजुरांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि कामांची तपासणी करावी, तसेच अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. घरकुल लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते तातडीने अदा करावेत, घरकुलाच्या जागेबाबतचे नियमानुकूल प्रस्ताव निकाली काढावेत, पंडित दीनदयाल योजनेतील अनुदान द्यावे, डोणगाव ते आरेगाव शिव हद्दीपर्यंतचा रस्ता तातडीने सुरू करावा, तसेच ग्रामपंचायत स्तरावर कामांचा सेल्फ निर्माण करण्यासाठी आवश्यक आदेश द्यावेत, या मागण्यांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
वीजपुरवठा, वन्यप्राणी नुकसानभरपाई आणि वृक्षतोडीचा मुद्दा
शेतकऱ्यांच्या वीज समस्यांबाबत वापर न करता आलेली वाढीव वीजबिले दुरुस्त करावीत. तसेच पावसाचा खंड पडलेल्या काळात शेतीसाठी पुरेसा आणि नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी आणि अवैध वृक्षतोडीवर कारवाई करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
शेतीमाल व साहित्य चोरीच्या घटनांचा तपास करण्याची मागणी
डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शेतकऱ्यांच्या शेतीमाल व साहित्याच्या चोरीच्या घटनांचा तपास करून संबंधित आरोपींचा शोध घ्यावा, तसेच परिसरात पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणीही आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
“मागण्या मान्य होईपर्यंत सत्याग्रह आंदोलन सुरूच राहणार”
याबाबत बोलताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी सांगितले की, “शेतकरी व नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर नियमानुसार तातडीने कार्यवाही करावी. संबंधित मागण्यांवर ठोस कार्यवाही होईपर्यंत सत्याग्रह आंदोलन सुरूच राहणार आहे.” तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक आणि नागरिकांनी आपल्या मागण्या व तक्रारी घेऊन आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केले आहे.