-५२ गावांत गणेशोत्सवाचा उत्साह; १३ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम, शांततेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा शहरात आठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्थापना करण्यात आली असून, साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५२ गावांमध्ये एकूण ७७ ठिकाणी श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यापैकी १३ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
साखरखेर्डा येथे काल रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली. शहरातील आठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाजतगाजत श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना केली. यामध्ये श्री शिवाजी व्यायामशाळा, श्री शिवाजी हायस्कूल, परदेशी गणेशोत्सव मंडळ, अहिल्याबाई होळकर गणेशोत्सव मंडळ, महात्मा ज्योतिबा फुले गणेशोत्सव मंडळ, बालनाथ गणेशोत्सव मंडळ, हिंदू सूर्य महाराणा प्रताप गणेशोत्सव मंडळ आणि संत रोहिदास गणेशोत्सव मंडळ यांचा समावेश आहे. साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १३ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमांतर्गत गणरायाची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५२ गावांमध्ये एकूण ७७ ठिकाणी श्रींची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, काल रात्री श्री शिवाजी व्यायामशाळा गणेश मंडळ आणि महात्मा ज्योतिबा फुले गणेश मंडळाच्या वतीने गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी आणि गणरायाच्या जयघोषात मिरवणूक काढल्यानंतर विधिवत पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी ठाणेदार युवराज रबडे यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रात्री गणरायाची स्थापना झाल्यानंतर पावसानेही दमदार हजेरी लावत गणरायाचे स्वागत केले. मात्र, पाऊस सुरू असतानाच साखरखेर्डा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. रात्रभर वीज गायब असल्याने नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी गणेशभक्तांकडून करण्यात आली आहे. सतत खंडित होणारा वीजपुरवठा ही परिसरातील मोठी समस्या झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींकडून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. परिसरात रात्रीच्या वेळी चोरटे फिरून कुलूपबंद घरे हेरून घरफोडी करीत असल्याने गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी रात्रीच्या गस्तीवरही विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.