-शहरात २७, ग्रामीण भागात ९ सार्वजनिक गणेश मंडळे; ४० होमगार्ड, १० प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदारांसह स्ट्रायकिंग फोर्स तैनात
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, उत्सवकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सिंदखेडराजा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात तब्बल २७ सार्वजनिक गणेश मंडळांची, तर सिंदखेडराजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात ९ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी ग्रामीण भागातील पाच गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची वाढणारी गर्दी, गणेश मंडळांचे विविध उपक्रम, मिरवणुका आणि विसर्जन कार्यक्रम लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. उत्सव शांततेत आणि आनंदी वातावरणात पार पडावा, यासाठी शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, गणेश मंडळांचे परिसर तसेच मिरवणूक मार्गावर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेडराजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार आशिष इंगळे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत चापाईतकर यांच्यासह सिंदखेडराजा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले आहेत. पोलीस बंदोबस्ताला अधिक बळकटी देण्यासाठी ४० होमगार्ड, १० नवप्रविष्ट प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार तसेच पोलीस मुख्यालयाचे स्ट्रायकिंग फोर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सवकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांना सुरक्षित वातावरणात उत्सव साजरा करता यावा, यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. गणेश मंडळांनीही उत्सव साजरा करताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, ध्वनिक्षेपकाचा योग्य वापर करावा, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि मिरवणुकीदरम्यान शांतता व शिस्त राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, ‘एक गाव, एक गणपती’ या उपक्रमातून सामाजिक एकोपा आणि सलोखा वाढण्यास मदत होत असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविणाऱ्या मंडळांचेही पोलीस प्रशासनाकडून स्वागत करण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा तसेच गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करावा, असे आवाहन सिंदखेडराजा पोलीस प्रशासनाने केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था ही सर्वोच्च प्राथमिकता ठेवून सिंदखेडराजा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.