-पावसाने महिनाभर दडी दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती; दिवसा वीजपुरवठा आणि नादुरुस्त डीपी तत्काळ बदलण्याची मागणी
चिखली (राजेंद्र घुबे) : बुलढाणा जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने दडी दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरीप हंगामातील सर्वच पिके पावसाअभावी कोमेजून गेलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी, बोअरवेल किंवा धरणातील पाणी उपलब्ध आहे, त्यांना योग्य विद्युतपुरवठा उपलब्ध नसल्याने त्यांच्याही समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यांना रात्री-बेरात्री अनियंत्रित वीज मिळत आहे. रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना जंगली श्वापदे, साप, विंचू यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा देण्यात यावा, तसेच नादुरुस्त डीपी तत्काळ बदलून विद्युत विभागाची रखडलेली कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे यांनी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री मा. मकरंद आबा पाटील यांच्याकडे दूरध्वनीद्वारे शंतनु बोंद्रे यांनी केली. यावेळी पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी मा. देवरे साहेबांशी सविस्तर चर्चा करत, शेतकरी संकटात सापडू नये आणि खरीप पिकांचे नुकसान टाळता यावे, यासाठी प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले. सदर निवेदन देतेवेळी चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष परिहार, जिल्हा उपाध्यक्ष विजय अंभोरे, बुलढाणा तालुका अध्यक्ष निलेश देठे, शहराध्यक्ष अनिल बावस्कर, सुजित देशमुख, विजय जावळे, झालटे, किशोर हेलगे, गणेश ठेंग, पुरुषोत्तम कदम, रामेश्वर इंगळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.