– ‘आधी वीज द्या, मगच उठणार!’; मंगरूळ नवघरे उपकेंद्रात शेतकऱ्यांचा ठिय्या; महावितरणला टाळे ठोकण्याचा इशारा!
– अधिकाऱ्यांची बेफिकिरी, शेतकऱ्यांचा रोष; लेखी आश्वासनाशिवाय मागे न हटण्याचा आक्रमक पवित्रा!
चिखली (अंकुश पाटील) : निसर्गाने साथ दिली, पण सरकारी यंत्रणेने घात केला, अशी उद्विग्न अवस्था चिखली तालुक्यातील १५ गावांतील शेतकऱ्यांची झाली आहे. विहिरीत मुबलक पाणी असूनही केवळ महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे आणि वीजपुरवठ्याअभावी डोळ्यांदेखत खरीप पिके करपू लागली आहेत. या सुस्तावलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी अखेर शेतकऱ्यांच्या संतापाचा बांध फुटला असून, मंगरूळ नवघरे येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रावर आज सकाळपासूनच संतप्त शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन पुकारले आहे.
दहिगाव, मंगरूळ नवघरे, पांढरदेव, घानमोड मानमोड, करतवाडी, वरखेड, नायगाव (खुर्द व बुद्रुक), पेनसावंगी, सावरखेड यासह तब्बल १५ गावांचा शेतीपंपाचा वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे विहिरी तुडुंब आहेत; मात्र, महावितरणच्या हलगर्जीपणामुळे पिकांना पाणी देता येत नाहीये. ऐन बहरात आलेले सोयाबीन, कापूस आणि तूर माना टाकू लागल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक खाईत लोटला जात आहे. “वीजबिल वसुलीसाठी दारात तगादा लावणारे महावितरण अधिकारी वीज देण्याची वेळ येते तेव्हा मात्र सोयीस्करपणे हात झटकतात,” असा घणाघात शेतकऱ्यांनी केला आहे. हा निव्वळ शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याची भावना आंदोलकांमध्ये आहे.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर आणि क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी या प्रश्नावर महावितरणचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. मात्र, दुपारचा एक वाजला तरी एकाही जबाबदार अधिकाऱ्याला आंदोलनस्थळी येण्याची तसदी घ्यावीशी वाटली नाही. या बेपर्वाईमुळे शेतकऱ्यांचा रोष अधिकच वाढला. अखेर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच कार्यकारी अभियंता चव्हाण यांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याचे जुजबी आश्वासन दिले असले, तरी संतप्त शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
- मंगरूळ नवघरे उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व १५ गावांचा खंडित कृषी वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा.
- शेतीसाठी दिवसा ८ तास पूर्ण दाबाने (व्होल्टेज) वीजपुरवठा व्हावा.
- वारंवार बिघडणारे रोहित्र (डीपी) आणि वीजवाहिन्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी.
जोपर्यंत मागण्यांचे लेखी आश्वासन मिळत नाही आणि प्रत्यक्षात वीजपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत उपकेंद्रातून एक पाऊलही मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा ८ ते १० गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी घेतला आहे. ठोस तोडगा न निघाल्यास महावितरण कार्यालयालाच टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आल्याने, उपकेंद्र परिसरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.