-वीजचोरी करताना सुमारे २५ जण आढळले; २ लाख ९९ हजार रुपयांचा दंड, वेळेत भरणा न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा
बिबी (ऋषी दंदाले) : सविस्तर वृत्त असे की, दि. ४ व ५ सप्टेंबर २०२६ पासून बिबी परिसरामध्ये मेहकरचे कार्यकारी अभियंता श्री. अनिरुद्ध आलेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आता दररोज वीजचोरी पकडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, बिबी परिसरातील विविध गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान जवळपास २५ जण वीजचोरी करताना आढळून आल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांना एकूण २ लाख ९९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, दंडाचे बिलही देण्यात आले आहे. संबंधितांनी ठरवून दिलेल्या वेळेत बिलाचा भरणा न केल्यास त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईसाठी मेहकर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अनिरुद्ध आलेगावकर, बिबी शाखेचे सहाय्यक अभियंता श्री. दुशांत वाबिटकर, प्रधान तंत्रज्ञ संजय खार्डे तसेच कर्मचारी श्री. राठोड, श्री. जाधव, विशाल वानखेडे, कोमल राठोड, राम जाधव, अजिंक्य नागरे, किरण थोरवे, विजय नागरे, विशाल भांड यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.