-पारंपरिक वाद्यांना प्राधान्य; आक्षेपार्ह देखावे टाळण्याचे आवाहन — उत्कृष्ट मंडळांना ‘गणराया पोलीस मित्र’ पुरस्कार : एसडीपीओ अर्जुन ठोसरे
चिखली (राजेंद्र घुबे) : आगामी पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सव शांततेत, भक्तिमय आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा करावा. मंडळांनी उत्सवाला सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची जोड देऊन समाजाला सकारात्मक संदेश द्यावा, असे आवाहन देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. अर्जुनजी ठोसरे यांनी केले.
अंढेरा पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी (५ सप्टेंबर) पोळा व गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलीस पाटील, गणेश मंडळांचे पदाधिकारी, सरपंच, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी तसेच पत्रकारांची बैठक घेण्यात आली. यावेळी उत्सव काळातील कायदा-सुव्यवस्था, मिरवणुका, ध्वनिप्रदूषण, मंडपाच्या परवानग्या तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५२ गावांचा समावेश असून, सुमारे ४० गणेश मंडळे अधिकृत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गणेश मंडळांनी ऑनलाइन पद्धतीने आवश्यक परवानगी घेऊनच मूर्तीची स्थापना करावी. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
डीजेला फाटा; पारंपरिक वाद्यांना प्राधान्य
ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करता लेझीम, ढोल, टाळ-मृदंग तसेच वारकरी संप्रदायाच्या टाळगजरासारख्या पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा आणि समाजप्रबोधनाचा उत्सव व्हावा, हीच पोलीस प्रशासनाची अपेक्षा आहे. गणेश मंडळांनी आक्षेपार्ह देखावे व घोषवाक्ये टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. रक्तदान, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, समाजप्रबोधन यांसारखे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंडळे व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. उत्कृष्ट नियोजन व सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मंडळांना ‘गणराया पोलीस मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात येईल.”
— अर्जुन ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, देऊळगाव राजा
आक्षेपार्ह देखावे टाळण्याचे आवाहन
गणेशोत्सवात कोणत्याही समाजाच्या अथवा धर्माच्या भावना दुखावतील, तेढ निर्माण होईल किंवा सामाजिक वातावरण बिघडेल, असे देखावे, घोषवाक्ये व मिरवणुकीतील आक्षेपार्ह प्रकार टाळावेत, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. उत्सवाच्या काळात भजन, कीर्तन, वारकरी दिंडी, रक्तदान, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेण्याचे आवाहन करण्यात आले. मंडप परिसरातील विद्युत व्यवस्था सुरक्षित ठेवावी, सुरक्षेसाठी स्वयंसेवक नियुक्त करावेत तसेच कोणतीही अनुचित घटना घडल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. पोळ्याच्या दिवशी मान-सन्मान अथवा अन्य कारणांवरून वाद होण्याची शक्यता असल्यास पोलिसांना पूर्वकल्पना द्यावी, तसेच ग्राम सुरक्षा दल सक्रिय करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. पोळा व गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिक व गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी केले.