-गोकुळाष्टमी सप्ताहात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात गोकुळाष्टमी सप्ताहांतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याचे विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून, परंपरांचे पालन करीत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध उपक्रम होत असून, भाविकांची कार्यक्रमांना तसेच श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. शुक्रवारी (दि. ४) ज्ञानाष्टमी आणि गोकुळाष्टमीनिमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव परंपरेने साजरा होत आहे. संपूर्ण दिवसभर विविध उपक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण होते. विविध कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असून, भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. महाप्रसादासाठीही सप्ताहाच्या काळात मोठी गर्दी होत आहे. जन्मोत्सव दिनी पहाटे घंटानाद, पवमान अभिषेक पूजा, दुधारती आणि ११ ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात अभिषेक झाला. सकाळी आणि दुपारी भाविकांचे दर्शन सुरू राहिले. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि गाथा भजनाची समाप्ती झाली. दुपारी गाभारा स्वच्छता आणि उपवासाचा महानैवेद्य परंपरेनुसार झाला. दुपारी एक वाजता पुन्हा भाविकांच्या दर्शनास सुरुवात झाली. त्यानंतर भजन सेवा तसेच श्रींना पोशाख करण्यात आला. संध्याकाळी आणि रात्री मुख्य जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दुपारी चार वाजता विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे प्रवचन झाले. सायंकाळी साडेसहा वाजता प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांचे कीर्तन झाले. त्यानंतर साडेआठ ते नऊ या वेळेत श्रींची धुपारती झाली. रात्री पंखा मंडपात संतोष मोझे यांच्या तर्फे जन्मोत्सवाचे कीर्तन शरद महाराज बंड यांचे, तसेच वीणा मंडपात भजन सेवा होणार असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
श्रींच्या जन्मोत्सवानिमित्त मध्यरात्री १२ ते १२.३० या वेळेत श्रींची मुख्य आरती, पुष्पवृष्टी आणि गोकुळ पूजा होणार आहे. रात्री हरिजागर सेवा परंपरेनुसार होत आहे. माऊली मंदिरात मध्यरात्री १२ वाजता श्री माऊली जन्मोत्सव सोहळ्यासमवेत श्रीकृष्ण जन्माचा मुख्य सोहळा होत आहे. श्रींच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट करण्यात आली होती. भाविकांनी श्रावण महिना आणि श्रींच्या जन्मोत्सवानिमित्त आळंदीतील विविध मंदिरांत दर्शनासाठी गर्दी केली. दर्शन आणि महाप्रसादाचा भक्तिमय उत्साहात लाभ घेत भाविकांनी जन्मोत्सव साजरा केला.