-पवित्र पोर्टलद्वारे शिवदीप लांडकर व अंजली लांडकर या बहीण-भावाची शिक्षकपदी निवड; लांडकर कुटुंबीयांचा कौटुंबिक सत्कार
अंकुश पाटील (चिखली) : मनात जिद्द आणि अभ्यासूवृत्ती असेल तर हमखास यशाचे शिखर गाठता येते, असे प्रतिपादन विष्णू थुट्टे यांनी केले. नुकत्याच जाहीर झालेल्या शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिवदीप लांडकर व कुमारी अंजली लांडकर या बहीण-भावाची शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल आयोजित कौटुंबिक सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
चिखली तालुक्यातील शिवशंकर विद्यालय, भरोसा येथील सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक, राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारप्राप्त तसेच माजी चिखली तालुका शालेय क्रीडा स्पर्धा संयोजक व विद्यार्थीप्रिय क्रीडा शिक्षक दिलीप लांडकर यांचा मुलगा शिवदीप लांडकर यांची पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषद अमरावती येथे शिक्षक म्हणून निवड झाली आहे. तसेच त्यांची मुलगी कुमारी अंजली दिलीप लांडकर हिची पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषद पुणे येथे शिक्षिका म्हणून निवड झाली आहे. दोघेही एम.एस्सी. भौतिकशास्त्र विषयात उच्चशिक्षित असून त्यांनी सेट परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे, दोघांचेही प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, मेरा भरोसा येथे झाले असून पुढील शालेय व बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण श्री शिवाजी विद्यालय व श्री शिवाजी सायन्स कॉलेज, चिखली येथे झाले आहे.
अमरावती येथे त्यांनी एम.एस्सी. फिजिक्सपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे, त्यांनी कुठल्याही बाहेरगावी महागडी फी असलेले शिकवणी वर्ग लावले नाहीत. चिखली येथील आपल्या निवासस्थानीच जिद्द, मेहनत आणि अभ्यासूवृत्तीच्या जोरावर त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. दोन वर्षांपूर्वी दिलीप लांडकर यांचा मोठा मुलगा सूरज लांडकर यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महसूल अधिकारी म्हणून निवड झाली असून ते सध्या सिल्लोड तालुक्यात महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आजच्या स्पर्धेच्या युगात लांडकर कुटुंबातील तीनही मुलांची शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल दिलीप लांडकर व सौ. सुनीताताई लांडकर यांचे पत्रकार अंकुश पाटील व विष्णू थुट्टे यांनी विशेष अभिनंदन केले. यावेळी शिवदीप लांडकर व कुमारी अंजली लांडकर या बहीण-भावाचा कौटुंबिक, भावस्पर्शी सत्कार पुष्पगुच्छ देऊन पत्रकार अंकुश पाटील व विष्णू थुट्टे यांच्या हस्ते करण्यात आला.