-ग्रामीण आरोग्यसेवेत उल्लेखनीय योगदान व कोरोना काळातील सेवाभावी कार्याची दखल
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : जगद्गुरु श्री. पलसिद्ध महास्वामीजी मठ संस्थान, साखरखेर्डा, बुलढाणा यांच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा, समाजहिताची तळमळ तसेच ग्रामीण आरोग्यसेवेला आधुनिकतेची नवी दिशा देणाऱ्या सेवाभावी कार्याची दखल घेत डॉ. नरेंद्र फिस्के यांना ‘परमपूज्य जगद्गुरु श्री. पलसिद्ध महास्वामीजी आरोग्यसेवा कार्य गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. वेदान्ताचार्य सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. नरेंद्र फिस्के यांनी मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख या छोट्याशा गावातून आपल्या वैद्यकीय सेवाप्रवासाची सुरुवात केली. कोरोना महामारीच्या अत्यंत भयावह आणि आव्हानात्मक काळात समाज भयभीत असताना, स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. गंभीर रुग्णांच्या उपचारांपासून आपत्कालीन वैद्यकीय सेवांपर्यंत त्यांनी बजावलेल्या कर्तव्याची समाजाने विशेष दखल घेतली. त्यांच्या या सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून त्यांना विविध स्तरांवर ‘आरोग्यदूत’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. वैद्यकीय ज्ञानाला मानवतेची जोड देत ‘रुग्णसेवा हीच मानवसेवा आणि समाजसेवा हीच खरी साधना’ या भावनेने कार्य करणाऱ्या डॉ. नरेंद्र फिस्के यांच्या ज्ञान, कर्तृत्व, सेवाभाव, सामाजिक बांधिलकी तसेच संकटसमयी बजावलेल्या अतुलनीय आरोग्यसेवेचा या पुरस्काराद्वारे गौरव करण्यात आला. जगद्गुरु पलसिद्ध महास्वामीजी यांच्या स्मृतीमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात वेदान्ताचार्य सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र फिस्के व त्यांच्या धर्मपत्नी डॉ. मृणालिनी फिस्के यांचा सन्मान करण्यात आला.