-रि. सेना जिल्हाप्रमुख नागवंशी संघपाल पनाड यांचे ऊर्जामंत्री व महावितरणकडे निवेदन; सुलतानपूर ग्रामसभेच्या ठरावाचीही दखल घेण्याची मागणी
लोणार (वाजिद खान) : सुलतानपूरसह लोणार तालुक्यात महावितरणकडून स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्याचे काम सुरू असून, ही सक्ती तत्काळ थांबवावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा रि. सेना जिल्हाप्रमुख नागवंशी संघपाल पनाड यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे ऊर्जामंत्री तसेच महावितरणच्या लोणार कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे.



निवेदनात म्हटले आहे की, सुलतानपूरसह लोणार तालुक्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या घरांवर स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्यात येत आहेत. स्मार्ट मीटर बसवू नयेत, यासंदर्भात सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेत ठरावही घेण्यात आला आहे. असे असतानाही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांवर दबाव आणून स्मार्ट मीटर बसवत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
नागरिकांच्या इच्छेविरोधात सुरू असलेली स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणी नागवंशी संघपाल पनाड यांनी केली आहे. नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये तसेच सुलतानपूर ग्रामसभेने घेतलेल्या ठरावाची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा, महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा, तहसीलदार लोणार आणि पोलीस निरीक्षक मेहकर यांना देण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी नागवंशी संघपाल पनाड, अनित्य घेवंदे, अख्तर भाई, दामुअण्ण सुरशे, पुरुषोत्तम गाडेकर, डॉ. देसाई, गोविंद मंत्री, सुखदेव देसाई, संतोष शिंदे, संतोष पाटील, अमीर भाई, सद्दाम भाई, गणेश रत्नपारखी, असीम पठाण, दामोधर कुकडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.