-स्वातंत्र्यदिनी डॉ. राधाकिसन राठी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण; सरपंच संदीप अल्हाट यांच्या उपक्रमाचे कौतुक
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील ग्रामपंचायत कार्यालयातील मुख्य ध्वजारोहणाचा मान माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक डॉ. राधाकिसन राठी यांना देण्यात आला. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ८१ वर्षीय डॉ. राधाकिसन राठी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयावरील मुख्य ध्वजारोहण डॉ. राधाकिसन राठी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ग्रामपंचायत परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रशासक संदीप अल्हाट, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला प्रशासकीय समिती सदस्य बाळू वानखेडे, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला चांगोणाबाई चव्हाण, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला रणजीत देशमुख, स्व. आनंदरावबापू देशमुख यांच्या पुतळ्याला शेख अबरार, वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश आमले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पोलीस पाटील गजानन पाचपोर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला रेखाताई आमले यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी अनंत आघाव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विद्यार्थी, शिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. गजानन मुंढे आणि नीरज पाटील यांनी केले. याशिवाय जिल्हा परिषद मराठी शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, श्री सरस्वती महाविद्यालय, श्री सरस्वती आश्रमशाळा, स्व. आनंदरावबापू देशमुख पतसंस्था यांसह इतर ठिकाणीही ध्वजारोहण करण्यात आले. प्रभातफेरीत सहभागी विद्यार्थ्यांना संघर्ष ग्रुपच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिकाजी गायकवाड, मनोज देशमुख, नितीन अल्हाट, दिलीप वानखेडे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
चौकट : सरपंचांचा स्तुत्य उपक्रम
सामान्यतः ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहणाचा मान संबंधित गावच्या सरपंचांना दिला जातो. मात्र, देऊळगाव साकरशा येथील सरपंच संदीप अल्हाट यांनी याला अपवाद ठरत आपल्या कार्यकाळात स्वतः ध्वजारोहण न करता माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर मान्यवरांना हा बहुमान दिला आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनीही त्यांनी ध्वजारोहणाचा मान ज्येष्ठ नागरिक डॉ. राधाकिसन राठी यांना दिला. सरपंचांचा हा उपक्रम दुर्मीळ असून, तितकाच कौतुकास्पद असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.