-इथेनॉल टँकर पलटल्यानंतर वाहतूक बदलली असताना उभ्या कारला आयसर ट्रकची जोरदार धडक; ट्रकला आग लागून सहा जणांचा दुर्दैवी अंत
वर्धा (प्रकाश कथले) : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर सोमवारी (दि. २० जुलै) पहाटे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. विरुळ शिवारातील समृद्धी महामार्गाच्या चॅनेज क्रमांक ७९/८० येथे घडलेल्या या हृदयद्रावक अपघातानंतर आयसर ट्रकला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर इथेनॉलने भरलेला एक टँकर पलटल्यामुळे वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई कॉरिडॉरवरील वाहतूक सुरू ठेवून नागपूर कॉरिडॉरवरील काही वाहने थांबविण्यात आली होती. याचदरम्यान उत्तर प्रदेश क्रमांक यूपी-७१ सीटी-०६०२ या आयसर ट्रकचा चालक संजय कुमार याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत समोर उभ्या असलेल्या एमएच-३२ वाय-१४३९ क्रमांकाच्या कारला मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. त्यानंतर आयसर ट्रकने पेट घेतला. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, ट्रकमधील वाहक समरजित पाल हा आगीत होरपळून मृत्युमुखी पडला. या अपघातात ट्रक चालक संजय कुमार (३०) व वाहक समरजित पाल (२४) (दोघेही उत्तर प्रदेश), तसेच कारमधील जानवी राजेश टिपले (२१), सुषमा राजेश टिपले (४३), राजेश आनंदराव टिपले (४८) आणि अंकुश लक्ष्मण राऊत (३३, सर्व रा. सालोड हिरापूर, जि. वर्धा) यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह महामार्गावरील रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जिल्हा रुग्णालय, वर्धा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संगीता कारखेले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता यादव, पोलीस उपनिरीक्षक तोडासे तसेच पुलगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करत पंचनामा केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण, ट्रकचा वेग तसेच इतर तांत्रिक बाबींचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.