-अत्याचारानंतर खून झाल्याचा संशय; तीन संशयित ताब्यात, शवविच्छेदन अहवालानंतर चित्र स्पष्ट होणार
वर्धा (प्रकाश कथले) : शहरालगतच्या एका गावात १२ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आल्यानंतर संपूर्ण वर्धा जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. ही माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी, श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा सर्व अंगांनी तपास सुरू करण्यात आला आहे. मयत मुलीचे आई-वडील शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. मुलीचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. प्राथमिक माहितीनुसार, मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने या संशयाला बळ मिळाले आहे. मात्र, अत्याचार झाला की नाही, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाच्या तपासात महिला पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला असून, पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या तीन संशयितांची कसून चौकशी सुरू असून, पुढील तपास सावंगी पोलिस करीत आहेत.