-सिंदखेडराज्यात एसआयआर कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीसाठी समन्वयावर भर
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांनी सोमवारी (दि. १३ जुलै) सिंदखेडराजा तालुक्याचा दौरा करून सुरू असलेल्या विशेष सखोल पुनर्रचना (SIR) प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील प्रक्रिया विहित मुदतीत व अचूकपणे पूर्ण व्हावी, या उद्देशाने तहसील कार्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
सिंदखेडराजा येथे आगमनानंतर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एसआयआर अंतर्गत सुरू असलेल्या तांत्रिक, प्रशासकीय तसेच क्षेत्रीय कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. दौऱ्यादरम्यान त्यांनी नोंदणी प्रक्रिया, दस्तऐवज पडताळणी, डिजिटल नोंदी तसेच क्षेत्रीय पातळीवरील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. कामाच्या अंमलबजावणीदरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यावर तातडीने प्रशासकीय मार्गदर्शन करण्यात आले. कामाची गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि माहितीची अचूकता यावर त्यांनी विशेष भर दिला.
तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत एसआयआर प्रक्रियेची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, डिजिटल नोंदींची पूर्तता तसेच उर्वरित कामांच्या नियोजनाचा सखोल आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागाकडून प्रगती अहवाल सादर करण्यात आला असून, कामाची गती वाढविण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे म्हणाले, “एसआयआर आणि निवडणूक प्रक्रिया या प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील जबाबदाऱ्या आहेत. या प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अथवा मानवी त्रुटी राहता कामा नये. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय राखून दिलेल्या मुदतीत अचूकपणे कामे पूर्ण करावीत. गुणवत्तापूर्ण कामकाज आणि जबाबदारीची जाणीव हीच यशस्वी अंमलबजावणीची गुरुकिल्ली आहे.”
या बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, गट विकास अधिकारी अजित बांगर, नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, सायली जाधव, श्री. मुंडे, निवडणूक नायब तहसीलदार संदीप बंगाळे, गट शिक्षणाधिकारी स्वप्नील निकम, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक काशिनाथ भोईर व रचना जाधव, तसेच नागेश खरात, प्रशांत वाघ, वृषाली घाणे, गणेश देशमुख, संजय सोनुने यांच्यासह निवडणूक शाखा, महसूल विभाग आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील एसआयआर प्रक्रियेला अधिक गती मिळणार असून, आगामी निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली प्रशासकीय पूर्वतयारी अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.