-एक आरोपी अटकेत; वन विभागाचे नागरिकांना अवैध कृत्यांची माहिती देण्याचे आवाहन
बुलढाणा (महिंद्रा हिवाळे) : गणेशनगर परिसरातील राखीव वनक्षेत्रामध्ये अवैधरित्या मेंढी चराई होत असल्याच्या तक्रारी वन विभागाला प्राप्त झाल्या होत्या. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने हनवतखेड बीट, वर्तुळ बुलढाणा, कक्ष क्रमांक ५२१ येथे छापा टाकून कारवाई केली.
कारवाईदरम्यान राखीव वनक्षेत्रात अवैधरित्या मेंढी चराई सुरू असल्याचे निदर्शनास आले. वन विभागाच्या पथकाने मेंढ्या जप्त करण्यासाठी पाठलाग केला असता संबंधित मेंढपाळांनी मेंढ्या वनक्षेत्रातून पळवून नेल्या. मात्र घटनास्थळावरून एका आरोपीस ताब्यात घेण्यात वन विभागाला यश आले. सदर आरोपी हरिभाऊ तानाजी कोळपे (वय ४० वर्षे, रा. पिंपळगाव नाथ) याच्याविरुद्ध संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार वन गुन्हा क्रमांक ००७६९/१९२११/१६/२०२६, दि. ०८/०७/२०२६ रोजी नोंदविण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
सदर कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनसंरक्षक (प्रा. व कॅम्पा) बुलढाणा वैभव काकडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) बुलढाणा सुनील वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. पथकाचे नेतृत्व वनपाल बुलढाणा प्रदीप प्रकाश मुंढे यांनी केले. कारवाईमध्ये वनरक्षक जी. आर. शिंदे (हनवतखेड बीट), एस. व्ही. झोटे, एस. व्ही. शिंदे, एन. ए. गवई, जी. एम. पोटे, वनरक्षक वाहनचालक प्रवीण सोनवणे तसेच वनमजूर दीपक सोनवणे, रवींद्र तायडे आणि पवन मुळे यांनी सहभाग घेतला. उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, राखीव वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारची अवैध चराई, अतिक्रमण अथवा वनविषयक बेकायदेशीर कृत्ये आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ वन विभागाला द्यावी, जेणेकरून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर त्वरित व प्रभावी कारवाई करता येईल.