कंत्राटदार आणि शासकीय यंत्रणेच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप; ९ किमी अंतराचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा
चिखली (अंकुश पाटील) : देऊळगांव धनगर ते मेरा चौकी दरम्यानच्या रहदारीच्या शासकीय रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून प्रवास करणारे सर्वसाधारण नागरिक, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असून, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर कित्येक जण गंभीर जखमी होऊन त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे.
अशाच एका खड्ड्यामुळे नुकताच चिखली न्यायालयातील वकील अॅड. जी. पी. थुट्टे यांना गंभीर अपघाताला सामोरे जावे लागले. ३ जानेवारी २०२६ रोजी अॅड. थुट्टे हे भरोसा गावाहून चिखली न्यायालयातील कामासाठी त्यांच्या दुचाकीने जात होते. वाहतुकीच्या नियमांचे पालन करत अत्यंत सावकाश जात असताना, भरोसा ते मेरा चौकी रस्त्यावरील महादेव मंदिराच्या मागे, शे. अहेमद यांच्या शेताजवळ रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात त्यांच्या डाव्या हाताला व खांद्याला गंभीर दुखापत झाली.
छत्रपती संभाजीनगर येथे शस्त्रक्रिया अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी अॅड. थुट्टे यांना तातडीने चिखली येथील डॉ. चिंचोले हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. सारंग व्यवहारे यांच्याकडे हलवण्यात आले. तेथे त्यांच्या डाव्या हाताच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, या अपघातामुळे त्यांना मोठे शारीरिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच न्यायालयीन कामकाज ठप्प झाल्याने मोठे व्यावसायिक नुकसानही झाले आहे.
हा ९ किलोमीटरचा संपूर्ण रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. संबंधित कंत्राटदाराने शासकीय यंत्रणेच्या संगनमताने अतिशय घाईघाईत आणि अत्यंत कमी दर्जाचे साहित्य वापरून हे काम केल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित विभागाने रस्त्याची कोणतीही प्रत्यक्ष पाहणी वा गुणवत्ता तपासणी न करताच कंत्राटदाराची बिले अदा केली आहेत. या मार्गावरून अवजड वाहनांची मोठी वाहतूक असल्याने रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.
ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
या प्रकरणी आता तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित यंत्रणेला नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासनाने या नोटीसीची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य दर्जाचे साहित्य वापरून रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी आणि प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी या रस्त्याचे काम तातडीने दर्जेदार पद्धतीने न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.