-खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका; दर्जेदार दुरुस्तीची नागरिकांची मागणी
चिखली (अंकुश पाटील) : देऊळगाव धनगर ते मेरा चौकी मार्गावरील सुमारे नऊ किलोमीटरचा शासकीय रस्ता निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पूर्णपणे खड्डेमय झाला असून वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून अनेकांना दुखापत तर काहींना जीवही गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध कामांसाठी ये-जा करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. ३ जानेवारी २०२६ रोजी ॲड. जी. पी. थुट्टे हे भरोसा येथून चिखली न्यायालयात दुचाकीने जात असताना भरोसा–मेरा चौकी मार्गावरील महादेव मंदिराजवळ, शेख अहमद यांच्या शेतालगत असलेल्या मोठ्या खड्ड्यात त्यांची दुचाकी घसरून ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने चिखली येथील डॉ. चिंचोळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. सारंग व्यवहारे यांच्याकडे हलविण्यात आले. तेथे त्यांच्या डाव्या खांद्याजवळ शस्त्रक्रिया करण्यात आली. या अपघातामुळे त्यांना शारीरिक त्रासाबरोबरच मोठा आर्थिक फटका बसला. तसेच उपचारामुळे काही काळ न्यायालयीन कामकाजही करता आले नसल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. नागरिकांच्या मते, संबंधित रस्त्याचे काम घाईगडबडीत व निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून करण्यात आले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य पाहणी न करता कंत्राटदाराला कामाची देयके अदा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. देऊळगाव धनगर ते मेरा चौकी या मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून संपूर्ण रस्त्याची दर्जेदार पुनर्बांधणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.