-अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली सरकारी शिक्षक; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याने पालकांचा संतप्त सवाल
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : “विद्यार्थ्यांच्या शिक्षणापेक्षा जर मतदार यादीचे काम अधिक महत्त्वाचे असेल, तर शाळा कशासाठी?” असा संतप्त सवाल उपस्थित करत शिक्षकांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांविरोधात पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांना वारंवार निवडणूक, बीएलओ, मतदार यादी पुनर्रचना, विविध सर्वेक्षणे, जनगणना आणि इतर शासकीय कामांमध्ये गुंतविल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असून, शासनाने याबाबत तातडीने पुनर्विचार करावा, अशी मागणी होत आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार दिला असला, तरी प्रत्यक्षात सरकारी शाळांतील शिक्षकांना अध्यापनापेक्षा अशैक्षणिक जबाबदाऱ्या अधिक दिल्या जात असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वर्गातील अध्यापनाचा वेळ कमी होत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना बसत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम पालक आपल्या मुलांना खासगी शाळा किंवा शिकवणीची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात. मात्र सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हाच शिक्षणाचा मुख्य आधार असल्याने शिक्षक वर्गाबाहेर गेले की विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. ३० जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. काही शाळांमध्ये शिक्षक उपस्थित होते, तर काही शिक्षकांना शासनाच्या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागले. अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये केवळ एक किंवा दोन शिक्षक कार्यरत आहेत. अशा शाळांतील शिक्षकांना मतदार यादीसारख्या कामासाठी बाहेर पाठविल्यास शाळाच बंद ठेवण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय, असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.
साखरखेर्डा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेचे उदाहरण देत पालकांनी चिंता व्यक्त केली. १९७८ साली या शाळेत सुमारे ५०० विद्यार्थी होते. आज २०२६ मध्ये ही संख्या केवळ १०० वर आली आहे. यावरून सरकारी प्राथमिक शिक्षणाची सद्यस्थिती स्पष्ट होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात राज्य उपाध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षक संघटना (महाराष्ट्र राज्य) दिलीप खंडारे यांनी सांगितले की, शिक्षक शिकवण्यात व्यस्त असतील तरच शिक्षणाचा दर्जा उंचावेल आणि देशाची भावी पिढी सक्षम बनेल. शासनाने शिक्षकांवरील अनावश्यक अशैक्षणिक कामांचा तातडीने पुनर्विचार करून त्यांना केवळ अध्यापनासाठी उपलब्ध करून द्यावे. मतदार यादी महत्त्वाची असली तरी विद्यार्थ्यांचे भविष्य त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. शिक्षकांना वर्गात राहू द्या, मुलांना शिकू द्या आणि देशाचे भविष्य घडू द्या, असे त्यांनी आवाहन केले. साखरखेर्डा येथील पालक देवानंद खंडागळे यांनीही संतप्त भावना व्यक्त करत सांगितले की, “माझा पाल्य शाळेत जातो; मात्र शिक्षक शासकीय कामासाठी बाहेर गेल्याने काही वेळातच घरी परत येतो. अशा परिस्थितीत मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने यावर तातडीने निर्णय घेऊन शिक्षकांना वर्गातच ठेवावे.”