-सेवाभावी कार्याचा गौरव; विविध सामाजिक संघटनांकडून शुभेच्छा, आरोग्य सेवेसाठी योगदानाचा सन्मान
आळंदी (अर्जुन मेदनकर) : राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त आळंदी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांचा आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय व सेवाभावी कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. विविध सामाजिक संस्था आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान करून सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. उर्मिला शिंदे यांनी आळंदी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. रुग्णांची संख्या मोठी असतानाही प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. तसेच गोरगरीब, वंचित आणि गरजू रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केल्याचे मान्यवरांनी नमूद केले. आळंदी शहरातील झोपडपट्टीधारक, पथविक्रेते आणि सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठीही डॉ. शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या या कार्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दल आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष संतोष सोनवणे यांनी डॉ. उर्मिला शिंदे तसेच ग्रामीण रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दलाच्या वतीने पुणे जिल्हा महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा नीलम सोनवणे, आळंदी नगरपरिषद सदस्या काजल धोंडगे, वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा सहसचिव धीरज कांबळे, खेड तालुका कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.