– व्हायरल व्हिडिओमुळे चिखली पोलिसांची नाचक्की; पोलीस आता तरी राहुल बोंद्रे यांना अटक करणार का?
मुंबई/चिखली (विशेष प्रतिनिधी) – परमहंस मौनीबाबा शिक्षण संस्था प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेले चिखली मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे हे गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांना गुंगारा देत असतानाच, थेट मुंबईतील विधान भवन परिसरात मुक्तपणे वावरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोंद्रे हे विधान भवनाच्या लॉबीमध्ये फिरत असल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित (व्हायरल) झाल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षण संस्थेच्या काही प्रशासकीय कामांसाठी कथित बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर चिखली पोलिसांनी राहुल बोंद्रे यांच्यासह इतर आरोपींचा शोध सुरू केला होता. पोलीस विविध ठिकाणी छापे टाकत असतानाही बोंद्रे गेल्या १५ दिवसांपासून पोलिसांच्या हाती लागत नव्हते. कागदोपत्री फरार असलेल्या आरोपीचा थेट हाय-प्रोफाइल सरकारी इमारतीत वावर आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या संदर्भातील व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेची पोलिसांनी खातरजमा करण्याची गरज आहे. ब्रेकिंग महाराष्ट्रलादेखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर मिळून आला आहे.
एकीकडे स्थानिक पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे राहुल बोंद्रे हे अतिशय महत्त्वाच्या आणि कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या विधान भवन परिसरात जाहीरपणे वावरताना दिसले. त्यांच्या उपस्थितीचे छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर गृह विभाग आणि तपास यंत्रणांच्या एकूणच कार्यक्षमतेवर विविध स्तरांतून टीका होत आहे. ‘पोलीस शोधत असताना आरोपी थेट मुंबईत फिरतोच कसा?’ असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, परमहंस मौनीबाबा शिक्षण संस्था प्रकरणाची व्याप्ती वाढू लागली असून, कायदेशीर कारवाईचा फास आवळला जात असल्याचे पाहून काही आरोपींनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता न्यायालयीन पातळीवर आणि पोलीस वर्तुळात काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या व्हिडिओमुळे चिखली पोलिसांची नाचक्की झाली असून, पोलीस आता बोंद्रेंना अटक करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.