-२६ कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात; लवकरच रुग्णालय सुरू होण्याची शक्यता
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालय सुरू करून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. अखेर शासनाने याची दखल घेत रुग्णालयासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच रुग्णालय कार्यान्वित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
साखरखेर्डा येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी परिसरातील नागरिकांनी तत्कालीन आरोग्यमंत्री तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार त्यांच्या कार्यकाळात साखरखेर्डा येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळाली. ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यानंतर साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्जन येथे स्थलांतरित होणार असल्याचेही निश्चित झाले होते. त्यानंतर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी रुग्णालयाच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला. सुमारे १८ कोटी रुपये खर्चून ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत उभारण्यात आली. मात्र आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास विलंब होत होता.
रुग्णालयासाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून आता पदभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पावसाळ्याच्या काळात वाढत्या रुग्णसंख्येमुळे साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रावरील ताण मोठ्या प्रमाणात वाढतो. जिल्ह्यात सर्वाधिक ओपीडी असलेल्या आरोग्य केंद्रांपैकी साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र एक असून येथे दररोज सुमारे ३०० ते ३५० रुग्ण उपचारासाठी येतात. गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी चिखली किंवा बुलढाणा येथे पाठवावे लागते. ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यानंतर ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
भरती होणारी पदे :
ग्रामीण रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षक वर्ग-१, वैद्यकीय अधिकारी गट-अ, अधिपरिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, सहाय्यक अधीक्षक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, कक्षसेवक, शिपाई, सफाई कर्मचारी आणि वाहनचालक आदी पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदभरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय सुरू होऊन परिसरातील हजारो नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.