-जिल्हा बँकेवर १४ वर्षांनंतर लोकनियुक्त संचालक मंडळ; डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : बुलढाणा जिल्ह्यातील सहकाराचा कणा आणि शेतकऱ्यांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेवर (BDCC) दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर लोकनियुक्त संचालक मंडळ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल १४ वर्षांनंतर जाहीर झालेल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा बँकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी भाजपने रणनीती आखल्याची चर्चा असून, या संपूर्ण निवडणुकीचे नेतृत्व सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. शिंगणे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जात असून, त्याबाबत केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असल्याचे समजते.
गेल्या वर्षभरापासून डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. मात्र, या प्रवेशाचा मुहूर्त कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज्य शासनाने जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर करताच या चर्चांना अधिक वेग आला आहे. जिल्ह्यात सहकारमहर्षी कै. भास्करराव शिंगणे यांनी विणलेले सहकाराचे जाळे आणि निर्माण केलेला दबदबा आजही कायम आहे. हाच वारसा पुढे चालवणाऱ्या डॉ. शिंगणे यांनी बँकेवरील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावल्याचे चित्र दिसत आहे.
सत्तेची पाठराखण आणि सहकाराचे पुनरुज्जीवन
जिल्ह्यातील विस्कळीत झालेली सहकार चळवळ, बंद पडलेल्या सूतगिरण्या आणि आर्थिक अडचणीत सापडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी सत्ताधारी पक्षाची मदत आवश्यक बनली आहे.
“केवळ विरोधी पक्षात राहून सहकाराचे जाळे विस्तारणे आणि शेतकऱ्यांना थेट मदत करणे शक्य नाही. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने शासकीय योजना व आर्थिक बळ मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे,” अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच राजकीय गणितातून डॉ. शिंगणे यांनी भाजपची वाट धरल्याचे बोलले जात आहे.
सर्वपक्षीय परंपरेला छेद; महायुती विरुद्ध इतर?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा इतिहास पाहता, ही निवडणूक आजवर सर्वपक्षीय पॅनेलच्या माध्यमातून, म्हणजे सर्व नेत्यांना सोबत घेऊन लढवली जात होती. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत यंदा हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीतील घटक पक्षांसह डॉ. शिंगणे समर्थकांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवली जाण्याची चिन्हे आहेत.
स्थानिक समीकरणांमध्ये अस्वस्थता; कार्यकर्त्यांचे पर्याय खुले
डॉ. शिंगणे यांचा निर्णय शिरसावंद्य मानणारा एक मोठा वर्ग असला, तरी या संभाव्य पक्षांतरामुळे काही स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. अशा नाराज कार्यकर्त्यांनी आपले राजकीय पर्याय खुले ठेवत जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे गट) नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व, आमदार संजय गायकवाड यांची आक्रमक शैली आणि डॉ. शशिकांत खेडेकर यांचे संयमी नेतृत्व यामुळे अनेकांनी शिंदे सेनेकडे पर्याय म्हणून पाहण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आगामी निवडणुकांवर दूरगामी परिणाम
जिल्हा बँकेच्या या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुप्रतीक्षित निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरच ही राजकीय मोर्चेबांधणी सुरू असल्याचे मानले जात आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे केवळ जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरच नव्हे, तर आगामी काळातील संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.