-जिजाऊ माँसाहेबांच्या मतदारसंघाचे भवितव्य अधांतरी!
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा मतदारसंघ हा मातृतीर्थ जिजाऊ माँसाहेबांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आज या मतदारसंघाची अवस्था “माय जेऊ चालेना आणि बाम भीक मागू देईना” अशी झाली आहे. लोकप्रतिनिधी फोन घेत नाहीत, म्हणून आज सिंदखेडराजा मतदारसंघातील अनेक अधिकारीही फोन घेत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना थेट कार्यालयात जावे लागते; मात्र तेथे गेल्यानंतर अधिकारी हजर नसतात.
सिंदखेडराजा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांची तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वीज वितरण कंपनीचे कार्यालय आदी ठिकाणी अनेक छोटी-मोठी कामे प्रलंबित असतात. त्या कामांसाठी सिंदखेडराजा येथे जाण्यापूर्वी नागरिक चौकशी करतात, “साहेब आज हजर आहेत का?” साहेब हजर असतील तरच नागरिक सिंदखेडराजा येथे जाण्याचा निर्णय घेतात. कारण विनाकारण हेलपाटे होऊ नयेत, अशी त्यांची अपेक्षा असते. आज तहसील कार्यालयात तहसीलदार हजर आहेत का, यासाठी फोन लावला तर तहसीलदार फोन उचलत नाहीत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात फोन केला तर तालुका कृषी अधिकारी फोन घेत नाहीत. पंचायत समिती कार्यालयात फोन लावला तर कोणीच फोन घेत नाही. अधिकारी कोठे आहेत, अशी विचारणा केली असता “दौऱ्यावर आहेत” असे उत्तर मिळते. कोणतेही काम करून घ्यायचे असेल तर दलाल ठरलेले आहेत. दलालामार्फत अधिकाऱ्यांची भेट घेतली जाऊ शकते, अशी अवस्था आज सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक कार्यालयांची झाली आहे. अधिकारी काम करत नाहीत म्हणून शेवटी लोकप्रतिनिधी हा दुवा साधून नागरिकांना आपली कामे करून घ्यावी लागतात. परंतु लोकप्रतिनिधीही सर्वसामान्य नागरिकांना सहज भेटत नाहीत. फोन केला तर लागत नाही. त्यासाठी त्यांना शोधत जावे लागते. आज सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी संपर्क हेच सर्वात मोठे साधन आहे. सर्वसामान्य नागरिकांचा संपर्कच तुटला तर न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सिंदखेडराजा तहसीलमार्फत छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान राबविण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी शेतरस्ते खुले करणे, मोजणी करून देणे तसेच महसूल विभागातील विविध कामांबाबत लेखी स्वरूपात मागण्या मांडल्या होत्या. परंतु त्या अभियानाचे फलित काय निघाले? आजही अनेक शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. त्यांना तहसीलदार भेटत नाहीत आणि कामेही होत नाहीत.
पंचायत समिती कार्यालयातही अशीच अवस्था आहे. सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मात्र आज आठ दिवस उलटूनही त्या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. घरकुलाचा हप्ता, विहिरीचा हप्ता मिळालेला नाही. ही हेल्पलाइन केवळ दिखाऊपणा ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. पंचायत समिती कार्यालयात जाऊन कामाबाबत चौकशी केली तर “अमुक कर्मचारी हजर नाही, फाईल त्यांच्याकडे आहे” असे सांगितले जाते. कर्मचारी हजर असला तर अधिकारी हजर नसतात. अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे नागरिकांना दिली जातात. शेतकऱ्यांना कोणत्या योजना सुरू आहेत, अर्ज कधी सादर करायचा, कृषी विषयक मार्गदर्शन कसे मिळवायचे याबाबत पुरेशी माहिती मिळत नाही. अनेक गावांमध्ये कृषी सहाय्यक नसल्याने शेतकऱ्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही.त्यामुळे आजी-माजी लोकप्रतिनिधींनी आता या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्रस्त नागरिकांनी दिला आहे.