-स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ५.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त
-देऊळगाव राजातील कांदा बियाणे चोरीचा पर्दाफाश; आंतरजिल्हा टोळी पोलिसांच्या जाळ्यात
देऊळगाव राजा (सुरेश हुसे) : देऊळगाव राजा येथील पिंपळनेर परिसरातील एका प्रक्रिया उद्योगातून लाखो रुपयांचे कांदा बियाणे चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) यशस्वी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेल्या कांदा बियाण्यासह दोन मोटारसायकली व तीन मोबाईल फोन असा एकूण ५ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चोरीच्या गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील भाजी मंडी परिसरातील रहिवासी मोहम्मद अझहर मोहम्मद कलंदर (वय ३६) यांनी दिनांक २ जून २०२६ रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, सिंदखेडराजा रोडवरील पिंपळनेर येथील जब्बूजी मायोमास ब्रिकेट इंडस्ट्री कंपनीमध्ये अथर्व प्रोसेसिंगसाठी आणण्यात आलेले अथर्व सीड्स कंपनीचे १४ पोते कांदा बियाणे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. ही चोरी २४ मे २०२६ रोजी रात्री ११.३८ ते २५ मे २०२६ रोजी पहाटे ४ वाजेदरम्यान घडली होती. चोरीस गेलेल्या कांदा बियाण्यांचे एकूण वजन ६ क्विंटल ६५ किलो असून, त्यांची किंमत ४ लाख ६५ हजार ५०० रुपये इतकी होती. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुन्ह्याची तातडीने उकल करून आरोपींना अटक करण्याचे तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी स्वतंत्र तपास पथक तयार करून समांतर तपास सुरू केला.
तपासादरम्यान दिनांक १३ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, पिंपळनेर येथून चोरीस गेलेले कांदा बियाणे जालना व अहिल्यानगर जिल्ह्यातील काही चोरट्यांनी चोरून नेले आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी शोधमोहीम राबवून आरोपींचा माग काढला. या कारवाईत अंकुश तेजराव खंदारे (वय ४०, रा. सातेगाव, ता. जाफ्राबाद, जि. जालना), विनोद विठ्ठल काळे (वय २९, रा. लोणगाव, ता. भोकरदन, जि. जालना) आणि भानुदास ऊर्फ राहुल बाबुराव गायकवाड (वय ३२, मूळ रा. देऊळगाव राजा, सध्या रा. भारस्करवाडी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मालापैकी ५ क्विंटल ३६ किलो कांदा बियाणे जप्त करण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल (किंमत ७० हजार रुपये), शाईन कंपनीची मोटारसायकल (किंमत ४० हजार रुपये) आणि तीन मोबाईल फोन (किंमत ३० हजार रुपये) असा एकूण ५ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे कांदा बियाणे चोरीला गेल्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने अल्पावधीत गुन्ह्याची उकल करून आरोपींना अटक केल्याने तसेच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने व्यापारी व शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक आशिष रोही, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गिरी, गजानन दराडे, जगदेव टेकाळे, युवराज राठोड, पोलीस कॉन्स्टेबल मनोज खरडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहेकॉ. राजू आडवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.