-चागेफळ येथे कृषीदूतांचा उपक्रम; वैज्ञानिक शेतीबाबत जनजागृती
चिखली (राजेंद्र घुबे) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला द्वारा संचालित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव (जामोद) येथील विद्यार्थ्यांनी चागेफळ गावकऱ्यांच्या सहकार्याने माती परीक्षणाचे महत्त्व पटवून दिले. महाविद्यालयाच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत चागेफळ येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत प्रत्यक्ष माती परीक्षणाचे काम हाती घेतले.
या उपक्रमात कृषीदूतांनी शेतातील मातीच्या नमुन्यांचे वैज्ञानिक पद्धतीने संकलन केले आणि शेतातील उत्पादनात वाढ कशी करता येईल, याविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांसमोर माती परीक्षणाचे फायदे विशद करताना मातीतील पोषणद्रव्यांची माहिती, त्यानुसार खतांचा वापर तसेच जमिनीचा प्रकार ओळखण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक शेतीविषयी जागरूकता निर्माण झाली. तसेच शेतकऱ्यांना योग्य सल्ला देत सेंद्रिय व शाश्वत शेतीचे मार्गदर्शनही करण्यात आले. या उपक्रमासाठी मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाच्या विषयतज्ज्ञ प्रा. अक्षदा देशमुख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात शेतकऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला आणि अनेक शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेण्याची तयारी दर्शवली. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई, कार्यक्रम अधिकारी तथा उपप्राचार्य सतीश धर्माळ, प्रा. प्रितेश वानखेडे, तसेच विषयतज्ज्ञ प्रा. अक्षदा देशमुख आणि प्रा. जिव्हेश साळी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कृषीदूत वैभव मेरत, प्रशांत घुबे, शुभम इनवते, वैभव चव्हाण, अर्जुन कंकाळे आणि श्रेयस नारखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.