-जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल कॅम्पला प्रारंभ ! अमरावतीच्या चकरा बंद, दगदग थांबणार !
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वकील, पक्षकार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वपूर्ण घडामोड आज घडली आहे. जिल्हा वकील संघ, बुलढाणा यांनी महसूल विषयक प्रकरणांच्या सुनावणीसाठी जिल्हा स्तरावर विशेष व्यवस्था करण्याची केलेली मागणी अखेर मान्य झाली असून, आज गुरुवार ११ जूनपासून विभागीय अप्पर आयुक्त वाघमारे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूल कॅम्पला सुरुवात करण्यात आली. या कॅम्पच्या माध्यमातून विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे दाखल असलेल्या महसूल तसेच विविध प्रकारच्या अपील, पुनर्विलोकन आणि इतर प्रशासकीय प्रकरणांची सुनावणी आता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथेच पार पडणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना, शेतकऱ्यांना तसेच वकिलांना सुनावणीसाठी अमरावती येथे वारंवार जावे लागणार नाही. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होणार असून न्यायप्रक्रियेलाही गती मिळणार आहे.
जिल्हा वकील संघाने गेल्या अनेक दिवसांपासून या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न केले. जिल्ह्यातील पक्षकारांना अमरावती येथे जाण्यासाठी होणारा आर्थिक व मानसिक त्रास, प्रवासाचा खर्च तसेच वेळेचा अपव्यय याकडे वकील संघाने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या मागणीची दखल घेत प्रशासनाने बुलढाणा येथे महसूल कॅम्प आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील कायदे क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे. महसूल कॅम्पमुळे प्रलंबित प्रकरणांच्या सुनावणीला वेग येणार असून, अनेक नागरिकांच्या समस्या स्थानिक पातळीवरच मार्गी लागण्यास मदत होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विजय सावळे यांनी व्यक्त केले. यामुळे महसूल विभागाशी संबंधित विविध प्रकरणांचा निपटारा अधिक प्रभावी आणि जलदगतीने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हा वकील संघाच्या प्रयत्नांचे वकील बांधव, पक्षकार तसेच विविध सामाजिक स्तरांतून कौतुक होत आहे. जिल्ह्यातील न्याय व प्रशासन व्यवस्था अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या सुविधा जिल्हा स्तरावर उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महसूल कॅम्पच्या माध्यमातून न्यायप्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि लोकाभिमुख होण्यास मोठी मदत होणार आहे.