-१५ जून रोजी सिंदखेडराजा येथे शेतकऱ्यांचा मोर्चा; पावत्या व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील अनेक शेतकरी आजही त्यांच्या हक्काच्या पीक विम्यापासून वंचित आहेत. शासनाने पिकांचे नुकसान मान्य केले असतानाही विमा रक्कम अद्याप मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती, सिंदखेडराजा येथून उपविभागीय कार्यालय, सिंदखेडराजा येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात झालेल्या बैठकीत प्रत्येक शेतकऱ्याने मोर्चात स्वतः उपस्थित राहून पीक विम्याच्या पावतीची झेरॉक्स प्रत व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, तसेच स्वतंत्र निवेदन प्रशासनाला सादर करावे, असा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक निवेदनासोबत पीक विम्याची पावती जोडण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने या मोर्चाचे नियोजन करण्यात आले असून हा लढा प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्काचा असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मोर्चामध्ये जमा होणाऱ्या प्रत्येक अर्जासाठी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. आवश्यक असल्यास मंत्रालय, मुंबई येथे जाऊनही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शेतकऱ्यांना भावनिक आवाहन
बैठकीत उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले की, “आज जर आपण आपल्या हक्कासाठी उभे राहिलो नाही, तर उद्या आपल्या मुलांनी विचारले की, ‘बाबा, तुमच्या पीक विम्यासाठी शेतकरी लढत होते, तेव्हा तुम्ही कुठे होता?’ तर त्याचे उत्तर आपल्याकडे असले पाहिजे.” त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाने मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.दरम्यान, या मोर्चाची पूर्वकल्पना व माहिती उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा, तहसीलदार सिंदखेडराजा, तालुका कृषी अधिकारी सिंदखेडराजा तसेच पोलीस स्टेशन सिंदखेडराजा यांना देण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.